30 वर्षांसाठी 1 रुपये भाड्याने जागा
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांना महापालिकेची 3 हजार 14 चौरस मीटर जागा विनानिविदा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यास मुख्यसभेने मान्यता दिली आहे. मात्र, ही जागा देताना ज्या कारणासाठी जागा देण्यात आली आहे त्याच कारणासाठी वापर व्हावा, तसेच जागा वापरात बदल करायचा झाल्यास महापालिकेची मान्यता घ्यावी, अशी उपसूचना या प्रस्तावाद्वारे देण्यात आली आहे. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील एकूण 17 जागांचा समावेश आहे. या जागा महामेट्रोला 30 वर्षे कराराने 1 रुपया दराने देण्यात येणार आहे. त्यात मेट्रो स्टेशनचे एन्ट्री-एक्झिट, लिफ्ट, फुट ओवर ब्रीज वापराकरिता कायमस्वरुपी उभारले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 17 जागा मागितल्या
मेट्रोच्या कामाची उपयुक्तता विचारात घेत महापालिकेच्या मालकीच्या जागा महामेट्रोला त्वरीत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने महापालिकेच्या मालकीची जागा किमान चालू बाजारभावाने भाडेपट्टा अथवा विक्री करून देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मिळकत वाटप नियमावली वगळता कोणत्याही मिळकतींचा विनियोग जाहीर निविदा मागवून करण्यात यावा, असे नमूद आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. त्यानुसार महामेट्रोने महापालिकेच्या मालकीच्या पहिल्या टप्प्यातील एकूण 17 जागा मागितल्या आहेत. त्यास अखेर मुख्यसभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.