मेट्रोसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची वीज तोडली

0

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाच्या कामाच्या आड येणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या मुख्य कार्यालयांची शनिवारी रात्री वीज तोडण्यात आली. पर्यायी जागा उपलब्ध न करता केलेल्या या कारवाईबद्दल या तिन्ही राजकीय पक्षांच्या गोटात नाराजी व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसचे गांधीभवन, राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी भवन तसेच शिवसेनेचे शिवालय, ही मुख्य कार्यालये नरीमन पॉईंटला मंत्रालयासमोर आहेत. ही कार्यालये दुसरीकडे हलवावीत, अशा सूचना शासन व पर्यायाने मेट्रोने दिल्या होत्या. यासाठी त्यांना २१ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण, शासनाने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध न केल्यामुळे या राजकीय पक्षांनी आपापली कार्यालये हलवली नव्हती. त्यावर कारवाई म्हणून शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या कार्यालयांमधली तसेच आसपासच्या बराकीतल्या काही शासकीय कार्यालयाची वीज खंडित करण्यात आल्याचे कळते.