मेट्रोसाठी 2 हजार कोटींचे कर्ज मंजूर

0

दिल्लीत करारावर फ्रान्सच्या आणि केंद्राच्या स्वाक्षर्‍या

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पासाठी 245 दशलक्ष युरोचे (सुमारे 2 हजार कोटी) कर्ज देण्याच्या करारावर फ्रान्सची एएफडी बँक आणि केंद्र सरकारच्या दि.28 रोजी स्वाक्षर्‍या झाल्या. पुढील वर्षी मार्चपासून या रकमेचा विनियोग महामेट्रोला करता येणार आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे महामेट्रोच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. डिसेंबर, 2020 पर्यंत पिंपरी चिंचवड – स्वारगेट आणि 2021पर्यंत वनाज – रामवाडी मार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

फ्रान्सची एएफडी बँक व केंद्र सरकारमध्ये झालेल्या करारावर फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलन व अर्थमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सी. एस. महापात्रा यांनी स्वाक्षर्‍या केल्या. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम उपस्थित होते.

दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोच्या निर्मितीसाठी 11 हजार 400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील काही हिस्सा महामेट्रो, केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के वाटा उचलतील. याशिवाय फ्रान्सकडून दोन हजार कोटी व युरोपियन इन्व्हेस्टेमेंट बँकेतर्फे 600 दशलक्ष युरो (सुमारे 4 हजार कोटी) रुपयांचे कर्ज मिळणार आहे. युरोपीय बँकेबरोबर येत्या तीन आठवड्यांत पुन्हा असाच करार होईल.

एएफडी बँकेकडून 1.2 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध झाले असून, त्याची परतफेड 20 वर्षांत करायची आहे. मेट्रोला लागणार्‍या विजेपैकी 65 टक्के विजेची गरज ही सौरऊर्जेने भागविण्यात येईल. हाही देशातील विक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले. मेट्रोची पुण्यातील स्थानके ही स्थानिक कला-संस्कृतीच्या वैशिष्ट्यांवर, तर पिंपरीचिंचवड च्या औद्योगिक पट्ट्यातील स्थानके ही स्थानिक थीमवर असतील. शिवाजीनगर येथील स्थानक तब्बल 30 मजली असेल. वर्षअखेरपर्यंत दोन्ही मार्गांवरील काही भाग प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचेही ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.

नागपूरचे काम पुण्यापेक्षा झपाट्याने!

पुणे मेट्रोच्याच बरोबर काम सुरू होऊन आता प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीच्या टप्प्यावर पोचलेल्या नागपूर मेट्रोचे काम पुण्यापेक्षा कितीतरी पटीने झपाट्याने झाले आहे. नागपूर मेट्रोच्या संपूर्ण पहिल्या टप्प्याचे 77 टक्के काम 27 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. लोकांसाठीच्या ‘जॉय राइड’ या चाचणीसही सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी, 2019अखेरपर्यंत 19 किलोमीटरचा पहिला टप्पा प्रत्यक्ष सुरू होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.