मुंबई । ‘आरे’त उभारल्या जाणार्या प्रस्तावित ‘मेट्रो’ कारशेडसाठी आतापर्यंत तब्बल 4 हजार झाडे तोडण्यात आली आहेत. आता यापुढे मनमानीपणे एकही झाड तोडू देणार नाही, अशी भूमिका वृक्ष प्राधिकणाच्या बैठकीत शिवसेनेने घेतली. या वेळी महापौर-गटनेत्यांच्या पाहणीनंतरच आवश्यकतेनुसार झाडांच्या तोडणीस मंजुरी मिळेल, असे शिवसेनेने स्पष्ट केले. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आरेतील ‘मेट्रो’ कारशेडसाठी 444 झाडांच्या तोडणीच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत यापुढे मनमानीपणे वृक्षतोडणीचे प्रस्ताव मंजूर करू देणार नाही, अशी भूमिका मांडली.
10 नोव्हेंबर रोजी दौरा काढणार
मुंबईतील झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे शिवसेनेने आधीपासूनच झाडे तोडणीच्या प्रस्तावाला विरोध केला, असे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आणखी 444 झाडांच्या तोडणीपूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेते आणि सर्वपक्षीय गटनेते यांचा संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेनेची भूमिका
10 नोव्हेंबर रोजी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी झाडांच्या तोडणीची खरंच आवश्यकता आहे का, याची पाहणी या वेळी केली जाणार असल्याचे जाधव म्हणाले. पालिका प्रशासनाने वॉर्डनिहाय वृक्षांचे मोफत वाटप करावे, वृक्ष संवर्धनासाठी वर्षातून चार वेळा प्रदर्शन भरवावे, झाडांच्या तोडणीनंतर नवीन झाडे लावली जातात का, पुनर्रोपण होते का याचा पाहणी करावी, झाडे तोडणीबाबत पर्यावरणवादी संघटनांना लक्ष घालण्याचे आवाहन करावे, असेही निर्णय घेण्यात आले.