मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याची जबरदस्ती

0

मुंबई । शिवसेनेचा विकासाला आणि मेट्रोला विरोध नाही. मात्र मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 30 हेक्टर जागेतील हजारो झाडांची कत्तल करण्यास शिवसेना, सामाजिक संघटना यांचा तीव्र विरोध आहे. पालिकेनेही मेट्रोला जागा देण्याचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. तरीही मुंबईच्या विकास आराखड्यात, या कारशेडच्या जागेला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळे परिपत्रक काढणे म्हणजे हुकूमशाही आहे अशी टिका महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली आहे. आरे संदर्भात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी महापौरांशी चर्चा केली. या चर्चेनंतर महापौर पत्रकारांशी बोलत होते.

कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची सूचना
महापौर महाडेश्‍वर यांनी नुकतीच आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडची स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांच्यासोबत पाहणी केली होती. मेट्रो कारशेडसाठी हजारो झाडांची कत्तल करून आरेमधील हरित पट्टा हटविण्यास शिवसेना, सामाजिक संस्था, संघटनांचा तीव्र विरोध आहे. सरकारने या मेट्रो कारशेडची आरेमधील जागा रद्द करून हे मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील जागेत हलविण्यात यावे, अशी सूचना महापौर महाडेश्‍वर यांच्यासह सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांंनी केली.

तीन वर्षांपासून आरे कारशेडला विरोध
या संघटनेकडून गेल्या तीन वर्षांपासून आरेमधील कारशेडच्या जागेला विरोध करण्यात येत आहे. तरीही सरकार दाद देत नसल्याचे पदाधिकारी तस्लिमा, रोहित, झोरू, आशिष पाटील व बिजू अगस्ती यांनी सांगितले. तोडलेली झाडे पुन्हा रोपित केली मात्र ही झाडे जगत नसल्याचे महापौरांनी सांगितले.