मुंबई : बहुचर्चित आरेमधीलमेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. या कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी ४ जणांची समिती मागील महिन्यात नेमण्यात आली होती. आरेमधूनमेट्रो कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का? याबाबत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार होती. यासाठी अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात मेट्रो कारशेड दुसऱ्या ठिकाणी घेवून जाणे व्यवहार्य होणार नाही असल्याचे म्हटले आहे. तसेच असे करण्यामुळे मेट्रोच्या कामाला विलंबदेखील होईल त्यामुळे आरेमध्ये कारशेड राहणं योग्य आहे असे सांगण्यात आले आहे.
आरेमधील मेट्रो कारशेडचं कामकाज सुरु ठेऊन राज्य सरकारने आरे वसाहतीच्या अंतर्गत ज्या जागेवर हिरवा पट्टा आहे त्याला जंगल म्हणून संरक्षण करता येईल अशी शिफारस केली आहे. २०१५ मध्ये आरेमध्ये मेट्रो कारशेड आणण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि मुंबई मेट्रो रेल अधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद रंगले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ४ ऑक्टोबर २०१९ रोजी एका रात्रीत मेट्रो कारशेडच्या ३३ हेक्टर जागेवरील २ हजार १४१ झाडे तोडण्यात आली.
प्रधान सचिव पर्यावरण अनिल दिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आर एस खुराना आणि मुख्य वनसंरक्षक (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अन्वर अहमद यांचाही या चार जणांच्या समितीमध्ये समावेश होता. या समितीला मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेणे, झाडे तोडण्यापूर्वी सर्व परवानग्या घेतल्या आहेत का याची तपासणी करणे आणि आरेतील झाडांचे संरक्षण आणि जतन करणे याचा अहवाल देण्यासाठी सांगितले होते.