मेट्रो कॉरिडॉर : 700 झाडांची होणार कत्तल!

0

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना जोडणारे दोन मेट्रोमार्ग विकसित करताना तब्बल 700 झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरणवाद्यांसह पुणेकरांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या झाडांची कत्तल टाळून मार्ग बांधा असा घोषा या नागरिकांनी महामेट्रोच्या अधिकार्‍यांकडे लावला आहे. वाढता दबाव पाहाता, मेट्रोचे अधिकारीही कमीत कमी झाडे कशी कापली जातील, याचे नियोजन करत असल्याचे सूत्राने सांगितले. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अनुसार या दोन कॅरिडॉरमध्ये एकूण 685 झाडे येतात. ती सर्व कापावी लागणारच आहेत. तरीही यातील किती झाडे जगविणे शक्य आहे, त्याचा विचार करत आहोत, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न : महामेट्रो
सविस्तर प्रकल्प अहवाल बनविताना जास्तीत जास्त झाडांची हानी टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे सांगून ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले, की प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असला तरी, आणखी काही झाडे वाचविता येणे शक्य आहे, याचे नियोजन व सर्वेक्षण हाती घेतले गेले आहे. त्यानुसार, जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वास्तविक पाहाता, सद्याचा आकडा पाहाता फार कमी झाडे कापली जाणार असून, जास्तीत जास्त झाडे यापूर्वीच आम्ही वाचविली आहेत, असेही दीक्षित म्हणाले. मेट्रोचे दोन मार्ग बांधले जाणार असून, ते 31.50 किलोमीटरचे असणार आहेत. त्यात पिंपरी ते स्वारगेट हा 16.58 किलोमीटर तर वनाज ते रामवाडी हा 14.92 किलोमीटरचा मार्ग असेल. मेट्रो मार्गाच्या बांधकामाला पिंपरी-चिंचवडमधून सुरुवातही झाली आहे. या मार्गामुळे बहुप्रतीक्षित ‘ग्रीन नेकलेस’च्या स्वप्नांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

ग्रीन नेकलेसमधील झाडेही शहीद होणार!
पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक प्रदूषण पाहाता, ग्रीन नेकलेस अंतर्गत 1980च्या सुमारास निगडी व नाशिक फाटा भागात फळ व मोठी वृक्षे लावण्यात आली होती. त्याद्वारे पिंपरीवासीयांना शुद्ध हवा मिळेल, असे उद्दिष्ट होते. 30 वर्षाच्या नियोजनाने ही झाडे जगविण्यासाठी मोठा खटाटोप करण्यात आला होता. ही झाडे आता मोठी झाली असताना यातील काही झाडे आता मेट्रो कॉरिडॉरमध्ये कापली जाणार आहेत, त्याबद्दल पिंपरीवासीयांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तीन दशकांपूर्वी ही झाडे लावण्याच्या मोहिमेत ज्यांनी पुढाकार घेतला होता, असे ज्येष्ठ नागरिकही या झाडांना वाचविण्यासाठी पुढे आले आहेत. पर्यावरण संवर्धन समितीचे (इसीए) अध्यक्ष विकास पाटील यांनीही झाडांच्या कत्तलीला विरोध केला असून, महामेट्रोने एक झाड कापताना त्याच्या बदल्यात पाच झाडे लावावीत. नंतरच झाडे कापावीत, असे सूचविले आहे. पहिल्यांदा महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावा, अशी सूचनाही त्यांनी केली.