मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत न्यावी

0

निगडी : पिंपरी-चिंचवड शहरातील एक महत्त्वपूर्ण परिसर म्हणून निगडीकडे पाहिले जाते. पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरातील हजारो विद्यार्थी, नागरिक हे दररोज शिक्षण तसेच कामानिमित्ताने पुणे शहरात जात असतात. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत न्यावी. अन्यथा महामेट्रो प्रकल्पाचे काम आम्ही बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या विषयासंदर्भात मनसे पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

शिष्टमंडळात यांचा समावेश
या शिष्टमंडळात पिंपरी-चिंचवड शहर मनसेचे प्रभारी गणेश सातपुते, शहराध्यक्ष सचिन चिखले, भोसरी विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, शहर सचिव राजू सावळे, उपविभाग अध्यक्ष राहुल जाधव, अमित तापकीर, सुशांत साळवी, फयाज नदाफ, मनोज लांडगे यांचा समावेश होता.

निगडी शहराचे शेवटचे टोक
केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पिंपरीपर्यंतच मेट्रो नेण्यात येणार आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजीची भावना असून, मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा उपयोग नागरिकांना होणार नाही. निगडी शहराचे शेवटचे टोक आहे. यासाठी मेट्रो निगडीपर्यंत असणे अत्यंत गरजेचे आहे. पिंपरी ते निगडी हे अंतर केवळ 6 किलोमीटर असून, निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी केवळ मेट्रोलाईन टाकण्याची गरज आहे. त्यामुळे जास्त काम करण्याची आवश्यकता नाही, असे निवेदनात म्हटले आहे.