मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत हवी, सिटीझन फोरमतर्फे miscall मोहीम

0

-अगोदर पिंपरीपर्यंत तरी मेट्रो धावू दे, निगडीचे नंतर बघू…असे वक्तव्य केले होते पालकमंत्र्यांनी

पिंपरी-चिंचवड : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास राज्य सरकारने 29 ऑक्टोबर 2013 ला मंजुरी दिली आहे. तर, केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2016 ला मान्यता दिली आहे. तरीदेखील पालकमंत्री गिरीश बापट आणि सत्ताधारी निगडीपर्यंत पहिल्याच टप्प्यात मेट्रो नेण्यास विलंब करत आहेत. याबाबत आवाज उठविण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमतर्फे miscall मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरवासियांनी 08030636448 या भ्रमणध्वनीवर miscall  देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन फोरमने केले आहे.

निगडीसाठी फोरम प्रयत्नशील
मेट्रो अगोदर पिंपरीपर्यंत सुरु होऊ द्या. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात येईल, अशी भूमिका बापट यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचा फोरमने निषेध केला होता. पालकमंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे संघटना आक्रमक झाली आहे. फोरमने वेळोवेळी मेट्रो संवादमध्ये सहभाग नोंदवून निगडीपर्यंत मेट्रो येण्याची गरज सांगितली होती. निगडी येथून पुण्यामध्ये शिक्षण व नोकरीसाठी जाणारा मोठा वर्ग आहे. यासाठी केवळ बस हे सार्वजनिक वाहतुकीचे एकमेव माध्यम आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा शहरवासीयांना फायदा होणार नाही. त्यामुळे मेट्रोची खरी गरज ही निगडीपर्यंत आहे. फोरमतर्फे वेळोवेळी मानवी साखळीद्वारे शांततेत मागणीही करण्यात आली. तसे निवेदनही मेट्रो प्रशासन व महापालिकेला देण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांचा होकार, पालकमंत्र्यांचा नकार
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास राज्य सरकारने 29 ऑक्टोबर 2013 ला मंजुरी दिली आहे. तर, केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2016 ला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास काहीच हरकत नाही. तसेच मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने देखील मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. परंतु, पालकमंत्री बापट यामध्ये खोडा घालताना दिसून येतात. पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत त्यांची ‘ना’ची भूमिका का आहे. याचे कारण समजत नाही.

फोरम उठविणार आवाज
बापट आणि सत्ताधारी निगडीपर्यंत पहिल्याच टप्प्यात मेट्रो नेण्यास विलंब करत आहेत. याबाबत आवाज उठविण्यासाठी फोरमतर्फे miscall मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे रविवारी (दि.21) उद्घाटन करण्यात आले आहे. शहरवासियांनी 08030636448 या भ्रमणध्वनीवर miscall देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. पुणे मेट्रोची पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत किती आवश्यकता आहे. हे सरकारपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, असे संघटनेने सांगितले आहे.