मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार

0

महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पिंपरी-चिंचवड : पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी, आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. त्यांनी मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती केली. याबाबतच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिले.

निगडीपर्यंत मेट्रोचा शहराला फायदा
शहराची लोकसंख्या सध्याच्या घडीला 25 लाखावर असून दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मेट्रोची निगडीपर्यंत गरज आहे. परंतु, पहिल्या टप्यांत मेट्रो पिंपरीपर्यंतच करण्यात येणार आहे. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी शहरवासियांकडून केली जात आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाचा फायदा केवळ 50 टक्के प्रवाशांनाच होणार आहे. उर्वरित शहरातील 50 टक्के नागरिकांना मेट्रोचा फायदा होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे मेट्रो पहिल्या टप्यातच स्वारगेट ते निगडीपर्यंत सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी महापालिका होणार्‍या संभाव्य खर्चाचा वाटा उचलण्यास समर्थ असून तशी समंती पालिकेने दिली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करावे, अशी विनंती लांडगे यांनी केली आहे.

मेट्रो सकारात्मक
मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत होणे गरजेची आहे. निगडीपर्यंत मेट्रोची किती आवश्यकता आहे, हे मी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे, असेही ते म्हणाले.