मेट्रो प्रकल्पाचा दूरदृष्टीने विचार व्हावा : लिमये

0

पुणे । कोणताही मेट्रो प्रकल्प हा पुढील तीस ते चाळीस वर्षांचा शहराचा विकास आणि परिस्थिती यांचा विचार करून आखला जातो. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाकडे संकुचित दृष्टीने न पाहता दूर दृष्टीने पाहावे, असे मत महामेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांनी व्यक्त केले. महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन्स फोरम (पीसीसीएफ) यांच्या वतीने सायन्स पार्क येथे आयोजित ‘मेट्रो संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मेट्रोचे प्रकल्प अधिकारी संतोष पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रसाद घारे, पीसीसीएफचे मुख्य समन्वयक वैभव घुगे, समन्वयक तुषार शिंदे, राजीव भावसार, आनंद पानसे, बिल्वा देव, सूर्यकांत मुथीयान, रोहन निघोजकर, अमोल देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

लिमये म्हणाले की, पुणे मेट्रो प्रकल्प निगडी आणि कात्रजपर्यंत न्यावा अशी मागणी सातत्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र नीट विचार केला तर आता सुरू झालेला प्रकल्प हा 2013 साली मान्य झालेला आहे. त्यानुसार आता कुठे काम सुरू आहे. मात्र असे असले तरीही केवळ या दोन मार्गांवर संकुचित न राहता आम्ही पुढे निगडी, मोशी, चाकण यांचाही विचार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

कोणत्याही शहरात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात ही लहान मार्गिकेने झाली असून आता त्यांचा विस्तार होत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. यामध्ये 44 किलोमीटरपासून सुरू झालेली बंगळूर मेट्रो आता काही वर्षांत आणखी 70 किमीपर्यंत वाढविण्यात येत आहे. आज 44 किमी वर सुरू झालेली चेन्नई मेट्रो ही पुढे आणखी 100 किमी वाढविण्यात येत आहे. तर दिल्ली मेट्रो ही पहिल्या टप्प्यात 65 किमी, दुसर्‍या टप्प्यात 140 किमी आणि आता तिसरा 100 किमीचा टप्पा पूर्ण करून एकूण तब्बल 300 किमी टप्पा गाठत आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रोचा विस्तार भविष्यात नक्की होईल. यासाठी आम्ही सकारात्मक आहोतच! मात्र यासाठी सकारात्मक असणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

याबरोबरच मेट्रो प्रकल्प सुरू असताना शहरात सुमारे पाच हजार कोटींपेक्षाही जास्त गुंतवणूक होणार असून याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार असल्याची माहितीही लिमये यांनी यावेळी दिली. या मेट्रो संवादमध्ये पिंपरी-चिंचवड सिटीझन्स फोरम बरोबरच ज्येष्ठ नागरिक महासंघ, ग्राहक पंचायत, भावसार व्हिजन, कला जनसेट, अभंग शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, विलो माथर प्लॅट, दुर्गा टेकडी गृप यांचे सदस्य व पदाधिकारी हेही सहभागी झाले होते. मेट्रो मित्रचे रितेश राठी यांनी मेट्रो प्रकल्पाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. बिल्वा देव यांनी प्रास्ताविक केले. तर तुषार शिंदे यांनी आभार मानले.