पुणे । पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद असून या प्रकल्पाबद्दल नागरिक सकारात्मक आहेत, असे मत महामेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांनी व्यक्त केले. महामेट्रोच्या वतीने खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय येथे झालेल्या मेट्रो संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विवेक गाडगीळ, कृष्णकुमार गोयल, विलासराव पंगुडवाले, आनंद छाजेड, प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी, उपप्राचार्य प्रा. अरुण शेलार उपस्थित होते.
विद्यार्थी आणि नागरिकांना मेट्रो प्रकल्पाची माहिती व्हावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी ‘मेट्रो संवाद’चे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली असून चार खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून आता कामाला अपेक्षित गती येईल. मेट्रो प्रकल्प वेळेत उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आम्हाला वेळ ठरवून दिला असून येत्या 2021पर्यंत आम्ही दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण करू असे लिमये यांनी यावेळी सांगितले.