पुणे । पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेला मेट्रो प्रकल्प हा पुणे शहराबरोबरच राज्यासाठी देखील महत्त्वाचा प्रकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करीत महामेट्रोला सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले.महामेट्रोच्या घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालयातील प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम्, सल्लागार शशिकांत लिमये आदी यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले संग्रहालयातील महामेट्रोच्या कार्यालयाची ही जागा सुमारे अडीच हजार चौरस फुट इतकी असून या ठिकाणाहून महामेट्रोचे प्रशासकीय काम चालणार आहे.
नागपूर मेट्रोनंतर पुणे मेट्रोची जबाबदारी पडली. प्रत्येक टप्प्यावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांचा सल्ला आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्याच प्रयत्नाने आम्हाला शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यालयासाठी जागा मिळू शकली. त्यांचे सहकार्य असेच कायम राहील, अशी आम्ही आशा करतो, असे डॉ. ब्रिजेश दीक्षित
यांनी सांगितले.
काम करणार वेळेत पूर्ण
मेट्रो, रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्ग हे प्रकल्प पुण्याच्या भविष्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असून यासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. याबरोबरच आता मेट्रोचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. इतकी वर्षे प्रतीक्षेत असलेली मेट्रो आता अखेर पुण्यात येत आहे. याचा आम्हाला आनंद असून मेट्रोमधून प्रवास करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी यावेळी सांगितले.