मुंबई : मेट्रो 2 ब च्या कामासाठी मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुलेनगर येथील रहिवाशांना जमीन संपादित करण्यासाठी अचानक नोटीसा पाठवल्या आहेत. अचानक नोटीस आल्याने झोपडपट्टी धारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एमएमआरडीएचे अधिकारी स्थानिकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. सर्व्हे करून तसेच कागदपत्रे तपासून योग्य जागी पुनर्वसन करावे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.
महात्मा फुलेनगर मानखुर्द येथे सुमारे 400 हुन अधिक झोपडपट्ट्या आहेत. मेट्रोचे स्थानक आणि कारशेड येथे येत असल्याने एमएमआरडीएने जवळपास 200 झोपडपट्टी धारकांना नोटीस बजावून पुनर्वसनासाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी सांगितले आहे. मेट्रो प्रकल्पात आपली घरे जात आहेत. याची त्यांना कल्पनाही नाही आणि अचानक नोटीस आल्याने झोपडपट्टी धारकांत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना येथील रहिवासी मनीष सदाशिव शिंदे, बाळासाहेब गोरे, राजू कांबळे, यांनी आमचा मेट्रोला विरोध नाही. मात्र, आमचा झोपडपट्टी सर्व्हे कधी केला ते देखील आम्हाला माहित नाही. एमएमआरडीए कार्यालयात जाऊन माहिती घेतली तर अधिकारी यावर बोलत नाहीत. तेव्हा पुनर्वसनासाठी 2000 पूर्वीचे लोकांचे पुनर्वसन होणार की नवीन निर्णयानुसार होणार हे अधिकारी सांगत नाहीत. त्यामुळे महात्मा फुले नगर येथील झोपडपट्टीधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.