नाशिक फाटा येथे घोषणाबाजी देत आंदोलन..
पिंपरी चिंचवड : नाशिक फाटा येथे शनिवारी मेट्रोचे काम सुरू असताना मोठी क्रेन (ड्रिल मशिन) कोसळल्याची घटना घडली. मेट्रो आणि सत्ताधारी भाजपच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्त नाशिक फाटा येथे रविवारी पक्षाच्या पदाधिकार्यांनी आंदोलन केले. प्रसंगी, सत्ताधारी भाजप आणि मेट्रो विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, प्रदेशचे संघटक विशाल काळभोर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दोषींवर कठोर कारवाई करा…
हे देखील वाचा
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोला राष्ट्रवादीने मंजूर मिळवली होती. मात्र आता सत्ताधारी भाजपकडून मेट्रोच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधार्यांचे कुठलेच नियंत्रण या कामावर नाही. भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना या कामाचे ठेके दिले गेलेत. प्रशिक्षित कामगार न वापरता येथे काम सुरू आहे. त्यामुळेच शनिवारच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली. यात कोणतीही जीवीतहाणी झाली नसली तरी पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली.
सत्ताधार्यांना जनतेच्या सुरक्षेचे देणेघेणे नाही…
विशाल वाकडकर म्हणाले की, सुदैवाने कालच्या अपघातात कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. परंतू मेट्रोचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एवढी मोठी घटना घडूनही आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच भाजपच्या कुठल्याच नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. यावरूनच सत्ताधार्यांना शहराबद्दल किती जाण आहे हे दिसून येत आहे. या अपघाताला जबाबदार असणार्या मेट्रो आणि सत्ताधारी भाजपाचा जाहीर निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाकडकर यांनी केली.