मेट्रो बांधकामांचे साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने वाहनचालक हैराण

0

मुंबई । सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मेट्रोच्या उभारणीचे काम वेगात सुरू असून, त्यामुळे पेट्रोल पंपाशेजारी पडलेल्या सामानामुळे वाहनात इंधन भरताना वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोरेगाव, कांदिवली आणि टाटा पॉवर हाऊस या परिसरात अहमदाबाद एक्स्प्रेसला लागूनच पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोलपंपांवर सकाळ आणि संध्याकाळी इंधन भरण्यासाठी प्रचंड रांगा लागलेल्या असतात. या वेळी या परिसरातील मेट्रोचे काम सुरू असल्याने साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असल्याने रांगा लावलेल्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

वायू आणि ध्वनिप्रदूषणातही वाढ
मेट्रोचे काम सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य दिसून येत असून, त्यामुळे प्रदूषण वाढ होत आहे. ज्यांना दम्याच्या विकाराचा त्रास आहे ते तोंडाला रूमाल बांधून परिसरातून प्रवास करत असल्याचे आढळून येत आहे. टाटा स्टील कंपनी परिसरातही टॉवरचे काम सुरू असल्याने त्याची धूळही सर्वत्र पसरून प्रदूषण होत आहे. रस्त्यावरील बॅरक आणि मेट्रोच्या कामाचे साहित्य अशा दुहेरी कचाट्यात प्रवासी आढळून आल्याचे दिसते.

तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
दहिसरपासून बोरिवली परिसरातील काम आटोपते आल्याने या परिसरातील वाहनचालकांना याचा म्हणावा असा त्रास सहन करावा लागत नाही. मात्र, बोरिवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव या परिसरातील वाहनचालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याची तक्रार केली असली तरी त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही.

विशेष करून रिक्षाचालकांच्या रांगा वाढत असल्याने त्याचा खाजगी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोलपंपचालकांचा त्यामुळे व्यवसाय कमी होत असल्याची ओरड आहे. मेट्रोच्या कामामुळे अडगळीत पडलेल्या पंक्चरवाल्यांनाही त्याचा फटका बसला असून, त्यांनी मुख्य रस्त्यावरच आपले ठाण मांडल्याने वाहतूककोंडीचा प्रश्‍नदेखील निर्माण होत आहे.