मेट्रो मार्ग हिरवळणार : पुणे मेट्रो उभारणार उभे बगिचे!

0

मेट्रो खांबावर वेली, झुडुपे लावणार; शहर सौंदर्यात पडणार भर

पुणे : वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी पुणे मेट्रोच्यावतीने मेट्रोमार्गावर उभे बगिचे (व्हर्टिकल गार्डन) उभारण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावर उभारण्यात येणार्‍या खांबांवर वेली, झुडुपे लावली जाणार असून, मेट्रोमार्गाखाली शक्य होईल तेथे बगिचे निर्माण केली जाणार असल्याची माहिती मेट्रोच्या सूत्राने दिली आहे. अशा प्रकारच्या उभ्या उद्यानांमुळे शहर सौंदर्यात भर तर पडेलच, शिवाय वाढत्या प्रदूषणालादेखील रोखता येणे शक्य होणार आहे. लवकरच या उभ्या बगिच्यांचे काम सुरु होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

नागपुरातील यशस्वी प्रयोग आता पुण्यात!
मेट्रो अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोमार्गाच्या खांबावर चौकटीसारखी जाळी बसविली जाणार असून, त्यावर वेली चढविल्या जातील तसेच छोट्या मातीच्या कुंड्या ठेवून त्यात झुडुपे लावली जातील. जेणेकरून हे खांब वेली व झुडुपांनी आच्छादून जाईल. त्यामुळे प्रत्येक खांबावर एक उभा बगिचा तयार होईल. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले, की अशा प्रकारचे व्हर्टिकल गार्डन (उभे बगिचे) नागपुरातील तीन खांबावर बनविण्यात आले असून, ते दिसण्यास आकर्षक आहेत. तसेच, त्यामुळे हिरवळ निर्माण होऊन प्रदूषणाची समस्यादेखील सुटण्यास मदत होईल. नागपुरात यशस्वी झालेला हा प्रयोग आता पुण्यातदेखील राबविला जाणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. या व्हर्टिकल गार्डनसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर केला जाणार असून, हे पाणी ठिबक सिंचनाद्वारे या वेली व झुडुपांना दिले जाईल. अशाप्रकारे पाणी बचत करून ही हिरवळ शहरातील मेट्रोमार्गात उभी केली जाणार असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले.

खांबांना रंगाचा खर्च वाचणार, स्वच्छ व नैसर्गिक हिरवळ लाभणार
अशा प्रकारच्या उभे उद्यानांमुळे मेट्रोच्या खांबांना रंग देण्याचा खर्च वाचून शहराला स्वच्छ व नैसर्गिक हिरवळ लाभेल, अशी आशा महामेट्रो प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे हे व्हर्टिकल गार्डन शहरातील सर्व महत्वाच्या खांबावर उभारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे उभे बगिचे यापूर्वी मेट्रोच्यावतीने दिल्ली, नागपूर, बेंगळुरू, कोची मेट्रो प्रकल्पातदेखील उभारण्यात आली आहेत. तोच प्रयोग आता पुण्यातदेखील राबविला जाणार आहे. प्रत्येक चौथ्या व सहाव्या खांबावर अशा प्रकारचा बगीचा राहणार असून, उर्वरित खांब हे जाहिरातींसाठी खुले ठेवले जाणार आहेत. त्या माध्यमातून मेट्रोला पैसादेखील मिळविता येणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 31.25 किलोमीटरचा मेट्रोमार्ग होणार असून, त्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट 16.60 किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी हा 14.70 किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. त्यासाठी एकूण 11 हजार 420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँक व आशियान इन्फ्रा. इन्वेस्टमेंट बँकेने 6 हजार 325 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. उर्वरित निधी हा केंद्र सरकार, राज्य सरकार व दोन्ही महापालिकांकडून प्राप्त होणार आहे. पुणे महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 67 कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे.