पिंपरी-चिंचवड : शहरात मेट्रोच्या कामाला चांगली गती मिळाली आहे. मात्र या कामांमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सध्या पुणे-मुंबई महामार्गावर स्पीड लेनमध्ये मेट्रो पिलरचे काम सुरु असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीला बंद आहे. केवळ पुण्याकडे जाणारी वाहतुकीची एक लेन सुरु आहे. त्यामुळे सर्व वाहने सेवा रस्त्यावरून जात आहेत. मात्र जड वाहनामुळे हा रस्ता उखडला जात आहे. रस्त्यावर खड्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. या सार्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे.
रस्त्यांची जबाबदारी महापालिकेची
या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार, या प्रश्नावर महामेट्रोचे उपअभियंता बापूसाहेब गायकवाड म्हणाले, रस्ता महापालिकेचा असल्यामुळे दुरुस्ती महापालिकेने करावी. परंतु, गरज पडल्यास या रस्त्याची दुरुस्ती मेट्रोतर्फे केली जाऊ शकते. मात्र सेवा रस्ता दुरुस्तीचे काम हे महापालिकेनेच करावे. तसे आम्ही महापालिकेला कळवले आहे.मात्र महापालिका या कामातून आपले अंग काढत असल्याचे चित्र आहे. यासंबंधी महापालिकेच्या संबंधित अधिकार्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे तूर्तास तरी सर्व्हिस रोडची दुरुस्ती राम भरोसे आहे.
मेट्रो प्रवाशांनी पार्किंग करायचे कोठे?
रस्त्यांप्रमाणेच वाहनांसाठी पार्किंगची सुविधा मेट्रोकडून शंभर टक्के केली जाईल, असे नाही. कारण मेट्रो सुरु झाल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे अपेक्षित आहे. कारण दुचाकी व चारचाकी वाहनांची वाढती संख्या पाहता भविष्यात मेट्रो स्थानकांवर नागरिकांना शंभर टक्के पार्कींग उपलब्ध होईलच असे नाही. याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, पार्किंगसाठी शहरात तीन ते चार ठिकाणी जागा पाहिल्या आहेत मात्र त्या पुरतील की नाही याबाबत साशंकता आहे.
44 खांबांचे काम सुरू
तसेच मेट्रोच्या कामात कापण्यात आलेली झाडे मेट्रो प्रशासनाने शहरातील इतर नियोजित स्थळी पुनर्रोपण करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार उद्याने विकसित करण्याचेही काम सुरु केले आहे. मेट्रो साठीच्या 44 खांबींचे काम सुरु आहे. त्यातील 9 खांब बांधून पूर्ण झाले आहेत. डिसेंबरच्या 25 ते 26 तारखेपर्यंत मेट्रो पुलाचा पहिला सेगमेंट टाकून तयार झालेला असेल असेही गायकवाड यांनी सांगितले.