पिंपरी-चिंचवड : मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कळविण्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी किती खर्च येणार आहे, याची महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनकडून माहिती मागविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अधिकार्यांशी महापालिकेत बैठक
सावळे यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकार्यांना महापालिकेत बोलावून निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प राबविण्याबाबत सविस्तर चर्चा केली. स्थायी अध्यक्षा सावळे यांनी निगडीपर्यंत मेट्रो करण्याची नागरिकांची मागणी रास्त असल्याने त्यावर अंमलबजावणी गरजेचे असल्याचे सांगितले. निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी काय काय प्रशासकीय कार्यवाही करणे अपेक्षित आहे, याची अधिकार्यांकडून माहिती घेतली. संबंधित अधिकार्यांनीही निगडीपर्यंत मेट्रो करण्यात काहीच अडचण नसल्याचे सांगितले.
अपेक्षीत खर्चाची माहिती द्या
सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पत्र देऊन निगडीपर्यंत मेट्रो करण्याच्या प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कळविण्यात यावे, असे त्यांनी आयुक्त हर्डीकर यांना पत्र दिले आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प करण्यासाठी किती खर्च येणार आहे, याची कॉर्पोरेशनकडून माहिती मागविण्याची मागणीही सावळे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.