मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतूक क्षेत्रात आमुलाग्र बदल – मुख्यमंत्री
मुंबई : पुण्यातील माहिती तंत्रज्ञान हब असलेल्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या हिंजवडी ते शिवाजी नगर या पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाचे प्रकल्प प्रदान पत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ट्रेल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (टी यु टी पी एल) – सिमेन्स कंपनीला देण्यात आले. राज्यातील सर्वच मेट्रोसाठी विशेषतः पुणे मेट्रो सुरू व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या विविध प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण होऊन कामे मार्गी लागली आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,पुण्यातील वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल ठरणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुणे मेट्रो 3 च्या हिंजवडी ते शिवाजी नगर मार्गावरील हा संपूर्ण एलिव्हेटेड प्रकल्प असून तो सार्वजनिक खाजगी भागीदारीतून राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनासह टाटा ग्रुपची कंपनी ट्रेल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (टी यु टी पी एल) आणि सिमेन्स हे भागीदार आहेत. या कंपन्यांना आज कार्यारंभ आदेश देण्यात आला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते, टाटा सन्सचे ग्रुप चेअरमन नटराजन चंद्रशेखर, टाटा ग्रुपच्या पायाभूत सुविधा,संरक्षण व ऐरोस्पेस विभागाचे अध्यक्ष बनमाली अगरवाला, पायाभूत सुविधा व नागरी वाहतूक विभागाचे प्रमुख संजय उबाळे, सिमेन्सचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी राल्फ हसीलबाचेर,व्यवस्थापकीय संचालक सुनील माथूर, सिमेन्सच्या औद्योगिक व आरोग्य वित्त विभागाचे कार्यकारी अधिकारी ॲथोनी कॅसियानो, टाटा प्रोजेक्ट लि. चे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे आदी उपस्थित होते. श्री. गित्ते यांनी टाटा कंपनीचे श्री. उबाळे व श्री. कॅसियानो यांना हे प्रदान पत्र दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नव्या मेट्रो रेल्वे धोरणाअंतर्गत हा पहिलाच प्रकल्प आहे. पुण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असून यामध्ये राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार आहे. हा प्रकल्प वेळेआधीच पूर्ण करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी सुरू करावी.
यावेळी अगरवाला म्हणाले की,प्रगतीशील महाराष्ट्र आणि या राज्याचे उत्तम नेतृत्त्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या प्रकल्पात सहभागी झालो आहोत. दीर्घकाळातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. ठरलेल्या वेळेत,कालबद्धरित्या हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इतर भागीदारांना आम्ही संपूर्ण सहकार्य करणार आहोत. या प्रकल्पामुळे पुण्यात आर्थिक क्षेत्रात वाढीबरोबरच रोजगार संधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन परिवर्तन होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारीतील प्रकल्प
हे देखील वाचा
राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी ते शिवाजीनगर संपूर्ण एलिव्हेटेड मार्ग
साधारण तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्देश
एकूण 23.3 किमी अंतर
23 मेट्रो स्थानके
साधारण एकावेळी 33 हजार प्रवासी वाहतुकीची क्षमता
सुमारे एक हजार थेट रोजगार निर्मिती
सुमारे 8,313 कोटींचा प्रकल्प
यामध्ये कंपन्यांचे 60 टक्के तर केंद्र व राज्य शासनाचे प्रत्येकी 20 टक्के हिस्सा
संकल्पन करा, बांधा, गुंतवणूक करा, चालावा व हस्तांतरित करा तत्वावर टाटा-सिमेन्स कंपनी पुढील 35 वर्षे या प्रकल्पाचे संचलन करणार