मेट्रो-3 साठी भुयार खोदायला उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

0

मुंबई । मुंबई मेट्रो-3 या प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्याच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. जे.एन. पेटीट ग्रंथालय आणि उद्यानाच्या आसपासच्या भागात भुयाराचे खोदकाम करु नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. भुयार खोदताना हेरिटेज इमारतींना धोका पोहोचू शकतो ही भीती व्यक्त करणारी एक जनहित याचिका जे.एन.पेटीट या 119 वर्ष जुन्या संस्थेच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

काय म्हणणे आहे याचिकाकर्त्याचे?
मेट्रो-3 या प्रकल्पामुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींना धोका निर्माण झाला असल्याचा दावा करत जे.एन. पेटीट या 119 वर्ष जुन्या संस्थेच्या ट्रस्टींनी याचिका दाखल केली आहे. पूर्णपणे भुयारी मार्ग असलेल्या अंधेरी-सीप्झ ते कुलाबा या मार्गाच्या कामाकरता जी अवजड यंत्रसामुग्री मागवण्यात आली आहे, त्याच्या व्हायब्रेशन्समुळे अनेक जुन्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. तसेच जमिनीखाली खोदकाम करताना शेकडो वर्षांपूर्वीच्या काही जुन्या इमारतींना यामुळे नुकसान होण्यास सुरुवात झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

तीन सदस्य समितीची नेमणूक
दरम्यान या प्रकल्पाकरता भुयार खोदण्याच्या कामामुळे खरोखरच हेरिटेज इमारतींना धोका पोहोचणार आहे का, याची पाहणी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पूर्ण दक्षिण मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या भागातल्या इमारतींची पाहणी करणार आहे. या पाहणीच्या अंती विशेष अहवाल सादर करणार आहे. त्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय प्रक्रिया होणार आहे.

इमारतीची आयआयटीकडून पाहणी
मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरी मागील सुनावणीच्या दरम्यान हे स्पष्ट केले होते की, आयआयटी मुंबईकडून हायकोर्टाच्या इमारतीची मेट्रो3 च्या संदर्भात पाहाणी करण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीने इतरही इमारतींची पाहाणी करता येऊ शकेल. अशा प्रकारे दक्षिण मुंबईतील इतरही पुरातन इमारतींची देखरेख या निमित्ताने करण्यात येणार आहे. त्यासाठी आयआयटीची समिती विशेष प्रयत्न करणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे कार्य होणार असून त्यावर मेट्रो प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असण्याची शक्यता आहे.