मुंबई । नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भाग्यलक्ष्मी मुठा (वय-20,रा. इचलकरंजी, जि.कोल्हापूर) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी भाग्यलक्ष्मीने मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. मित्राने भाग्यलक्ष्मीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिने ऐकले नाही.अखेर दुपारी एक वाजता तिने खोलीत गळफास लावून जीवनप्रवास संपवला. रूममेटला भाग्यलक्ष्मी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर भाग्यलक्ष्मी हिला केइएम हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या कारणामुळे उचलले टोकाचे पाऊल…
भाग्यलक्ष्मीला बीडीएसचे शिक्षण कठीण जात असल्याने ती मागील काही महिन्यांपासून त्रस्त होती. मेडिकलचे शिक्षण अर्ध्यात सोडले तर आई-वडीलांना कमीपणा वाटेल, अशी भीतीही तिला वाटत होती. तिने रेडिओलॉजीचे शिक्षण घेणार्या मित्राला मेसेज पाठवून सिलॅबस कठीण वाटत असल्याचे सांगितले होते. ’आई-वडील माझ्या शिक्षणावर खूप पैसा खर्च करत आहेत. मी प्रचंड हताश असून आत्महत्या करत आहे.’ असे तिने मेसेजमध्ये म्हटले होते.