जळगाव । जळगाव येथे चिंचोली शिवारात उभारण्यात येणाजया वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्यावतीने मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 191 कोटी 90 लाख 24 हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात 10 मे रोजी निर्णय घेण्यात आला असून निविदा प्रक्रियेनंतर बांधकामास सुरुवात होणार आहे. जळगाव येथे वैद्यकीय संकूल (मेडीकल हब) उभारणीसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली. त्यानुसार जळगाव-औरंगाबाद मार्गावर जळगावपासून 5 किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे हे संकुल उभारले जाणार आहे. त्यामुळे वैद्यकिय क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रक्रियेनंतर बांधकामास सुरुवात होणार
या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि दंत्त महाविद्यालय उभारण्यात येईल. या संकुलामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल. तसेच 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय या मेडिकल हबमध्ये असेल. चिंचोली शिवारातील ही जागा गेल्या महिन्यातच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाली होती. तूर्त हे महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातपासून सुरू होणार असले तरी चिंचोली शिवारात बांधकामासाठी मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार 10 मे रोजी शासन निर्णय होऊन या महाविद्यालयाच्या बांधकामास शासनाने मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 208 कोटी 79 लाख एवढी प्रस्तावित रक्कम आहे. त्यापैकी 191 कोटी 90 लाख 24 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून बांधकामास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले.