शेंदुर्णी – येथुन जवळच असलेल्या मेणगाव येथील रहिवासी रुपाली पाटील यांना अमेरीकेतील एसडब्ल्यूई … या संस्थेतर्फे प्रतिष्ठीत नवीन अभियंता हा वार्षिक पुरस्कार विस्तीर्ण तांत्रिक कौशल्य आणि सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याची तीव्र इच्छा आणि एसडब्ल्यूईसाठी विलक्षण सेवेसाठी (विशेषकरून आंतरराष्ट्रीय उपक्रमात) सहयोग कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. मेणगावचे माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या रुपाली कन्या आहेत, पूरस्कार प्रदान समारंभ २० आक्टोबर रोजी अमेरिकेतील मिनिओपोलीस येथील एसडब्ल्यूई वार्षिक परिषदेत होणार आहे.
एसडब्ल्यूई ही संस्था १९५० साली अमेरिकेत स्थापन करण्यात आली. इंजिनियरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे समर्थन करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. महिलांना इंजिनियरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि इंजिनियरिंग व्यवसायाची सकारात्मक प्रतिमा भावी पिढी समोर मांडणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या जामनेर तालुक्यातील रुपाली पाटील पहिल्याच महिला अभियंता असुन पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच मेणगाव येथे आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच छोट्याश्या खेडयातुन सातासमुद्रापार झेंडा रोऊन देशाचे तसेच गावाचे नाव उंचवल्याचा अभिमान असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.