मेथी गावाजवळ तीन वाहनांच्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार

मृतांमध्ये मेथी गावातील दोघांचा तर दोंडाईचातील एकाचा समावेश

दोंडाईचा : भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानंतर दुचाकी ट्रॅक्टरवर जावून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले. शनिवार, 23 रोजी रात्री उशिरा हा अपघात शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावाजवळील भडणे फाट्याजवळ घडला. मृतांमध्ये दोंडाईतील एक तर दोन मेथी गावातील रहिवासी आहेत.

भीषण अपघातात तिघे ठार
धुळ्याहून जाणार्‍या ट्रकने (क्र.एम.एच., 18 बी.जी. 6398) दोंडाईचाकडे जात असलेल्या दुचाकी (क्र.एम.एच., 18 बी.बी. 6201) ला मागून धडक दिल्याने दुचाकी 100 मीटर अंतरावर चालत असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या अपघातात हर्षल सरदार ठाकूर (31, महादेवपूरा, दोंडाईचा) ट्रॅक्टर चालक आननसिंग भामासिंग गिरासे (31) व सालदार सुकराम बाबुराव भील (32, दोन्ही रा. मेथी) हे ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.