मेन्टेनन्स काम करताना शॉर्ट सर्किट : भुसावळात ऑईल फॅक्टरी खाक

कन्हाळा शिवारातील एमआयडीसीत शॉर्ट सर्किटने लागली आग : 50 लाखांचे नुकसान

भुसावळ : कन्हाळा शिवारात असलेल्या एमआयडीसी परीसरातील जेबीएन या ज्वलनशील ऑईन बनवणार्‍या (प्लॉस्टीक पॅरालिसीस ऑईल) कंपनीत मेन्टेनन्स (दुरुस्ती) काम सुरू असतानाच अचानक शॉर्ट सर्किट होवून कॉम्प्रेसरने पेट घेतल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत कंपनी खाक झाली. मंगळवार, 11 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीने पाहता-पाहता रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण कंपनीत आगीच्या विळख्यात सापडल्याने सुमारे 50 लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भुसावळ पालिकेसह दीपनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

ज्वलनशील ऑईल बनवणार्‍या कंपनीत आग
शिवपूर-कन्हाळा शिवारातील एमआयडीसी परीसरात गाळा क्रमांक एफ- 21 मध्ये पूर्वी भाग्यश्री इंण्डड्रीज या कंपनीत मेणबत्ती बनवण्याचे काम केले जात होते मात्र काही वर्षांपासून ही कंपनी जळगावस्थित व्यापार्‍यांनी भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतल्यानंतर येथे प्लॅस्टीक पॅरालीसीस ऑईल (ज्वलनशील ऑईल) तयार करण्यात येत होते. मंगळवारी सकाळी कंपनीचे आठ कर्मचारी दुरुस्तीचे (मेन्टेनन्स) करीत असताना वीज प्रवाह असलेली वायर ज्वलनशील ऑईलजवळ पडताच आग लागली. सुरूवातीला अग्निरोधक सिलिंडरचा वापर करण्यात आला मात्र पाहता-पाहता ज्वलनशील ऑईलने पेट घेतल्याने संपूर्ण कंपनीत आगीचा विळखा पसरला.

तासाभरात संपूर्ण फॅक्टरी खाक
आगीच्या ज्वाला संपूर्ण फॅक्टरीत पसरल्याने फॅक्टरीत असलेले तीन कॉम्प्रेसर तसेच ऑईलच्या टाक्या व रीकाम्या टाक्या तसेच अन्य कंपनीतील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. नागरीकांनी भुसावळ नगरपालिका व दीपनगर प्रशासनाला माहिती कळवल्यानंतर दोन अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे 50 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनी मालक मयूर भोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महसूल प्रशासनाची धाव
तहसीलदार दीपक धीवरे यांना आग लागल्याची माहिती कळताच त्यांनी महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी रवाना केले. शिवपूर-कन्हाळा तलाठी माधुरी सोनवणे, खडका तलाठी मनीषा गायकवाड, मंडळाधिकारी एस.एस.खान, कोतवाल आदींनी घटनास्थळी भेट देत नेमकी माहिती जाणून घेतली. यावेळी फॅक्टरी मालक मयूर भोळे यांनी आगीच्या कारणाची माहिती महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांना दिली. रात्री उशिरापर्यंत आगीबाबत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुदैवाने मजूर बचावले
ऑईल फॅक्टरी मेन्टेनन्सचे काम मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून आठ कर्मचार्‍यांकडून सुरू करण्यात आले होते मात्र अचानक वीज प्रवाह असलेली वायर तुटून ती ऑईल असलेल्या भागात शॉर्ट सर्किट झाले मात्र अशाही परीस्थितीत मजुरांनी अग्निरोधक सिलिंडरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने वेळीच कर्मचार्‍यांनी सर्तकता दाखवत फॅक्टरी बाहेर पाय काढल्याने कुणीही जखमी झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.