मेरी सहेली मंडळातर्फे राख्यांचे प्रदर्शन

0

बिबवेवाडी : विशेष मुले आणि महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन सातारा रस्ता येथील पुष्प मंगल कार्यालयात मागील सोळा वर्षांपासून मेरी सहेली मंडळातर्फे आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात अंध मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारी महाबळेश्वर येथील ओशोनिक विजन संस्थेच्या मुलांनी बनविलेल्या राख्या आणि इतर वस्तू ठेवण्यात येतात. यंदा अंध मुलांनी तयार केलेल्या आकर्षक राख्या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

ओशोनिक विजन संस्थेतर्फे अंध मुलांसाठी व्यवसायाभिमुख कोर्सेस चालविण्यात येतात. विशिष्ट कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध वस्तू तयार करतात. संस्थेतर्फे या वस्तू प्रदर्शनात मांडल्या जातात. त्यातून मिळणारा निधी अंधांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येतो. रक्षाबंधनाच्या वेळी राख्यांचे प्रदर्शन, दिवाळीच्या वेळी आकाश कंदील आणि पणत्या या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. वर्षभर इतर वस्तूंची देखील प्रदर्शने भरविण्यात येतात. यातून संस्थेला आणि पर्यायाने अंध मुलांना आर्थिक आधार मिळतो. तसेच त्यांनी केलेल्या कामाचे चीज होत असल्याचे लक्षात येताच ती मुले नव्या जोमाने आणि नव्या कल्पकतेने वस्तू तयार करतात. प्रदर्शनामध्ये घरगुती व्यवसाय करणार्‍या महिलांनी बनविलेल्या वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता. प्रदर्शनाचे आयोजन मंडळाच्या अध्यक्षा देवी तन्ना यांनी केले होते.