मेल, एक्स्प्रेसच्या दरात राजधानी, शताब्दीमधून प्रवास

0

नवी दिल्ली। मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या दरात आता राजधानी किंवा शताब्दीसारख्या प्रीमिअर गाड्यांमधून प्रवास करण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध होऊ शकते. याचे कारण प्रतीक्षा यादीत असणार्‍या प्रवाशांसाठी रेल्वेकडून नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या योजनेचे नाव विकल्प असे असणार आहे.

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा असेल त्या दिशेने जाणार्‍या राजधानी वा शताब्दीतील रिक्त आसनांचे आरक्षण या प्रवाशांना मिळू शकेल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही किंवा शुल्कात असलेली तफावतही प्रवाशांना मिळणार नाही. मात्र, तिकीट आरक्षण करतानाच याचा पर्याय प्रवाशांना निवडावा लागणार आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठीच ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रीमियम गाड्यांमध्ये डायनामिक तिकीट प्रणाली लागू केल्यापासून तिकीट आरक्षणाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे अन्य मेल, एक्स्प्रेसमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी ही नवी योजना आणली आहे, अशी माहिती एका अधिकार्‍यांकडून देण्यात आली. विविध कारणांमुळे तिकीट रद्द केल्यामुळे रेल्वेला सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये परतावा म्हणून द्यावे लागतात.