मेळघाटातील दुर्गम बुलूम गव्हाणमध्ये 70 वर्षांनंतर सरकारने वीज पोहोचवली

0

मुंबई । मेळघाटातील दुर्गम बुलूम गव्हाण येथे स्वातंत्र्यानंतर वीज पोहोचणे हे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्रामविकास परिवर्तन अभियानामुळे शक्य झाले. आता बुलूम गव्हाणमधून तरुण-तरुणी उच्चशिक्षित झाले पाहिजे. सन 2022 पर्यंत मेळघाटातील प्रत्येक आदिवासी हा शिक्षित करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे उद्दिष्ट आमच्या सरकारचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले. ते बुलूमगव्हाण या दुर्गम गावात विकास कामांचा शुभारंभ करतांना उद्घाटक म्हणून उपस्थितांना संबोधित करीत होते.

धारणीपासून 25 कि.मी. अंतरावर घनदाट जंगलाने वेढलेल्या दुर्गम बुलूम गव्हाण या आदिवासीबहुल गावात 70 वर्षानंतर वीज पोहोचली. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमाचे ग्राम परिवर्तक आनंद जोशी या 23 वर्षीय तरुणाने अपार कष्ट करून आदिवासी परिवाराच्या आयुष्यात विजेचा लखलखाट करून दिला. नुकतेच पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात वीजपुरवठ्याचे व बुलूम गव्हाण ते धारणी या एस.टी. बस फेरीचा शुभारंभ केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, एसडीएम विजय राठोड, सरपंच गोविंद कासदेकर, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, जि. प. सदस्य महेंद्रसिंग गहेरवार, पं.स. उपसभापती जगदीश हेगडे, ग्रामसेविका व्ही. व्ही. घवळे, पाणी फाऊंडेशनचे सोशल मास्टर ट्रेनर प्रमोद निपाणे, गिता बेलपत्रे, नागोलाल पटोरकर, रामेश्‍वर धांडे, धारणी एमएसईबीचे उपकार्यकारी अभियंता विनय तायडे, आशिष कुंभलेकर एसडीओ मोर्शी यांची उपस्थिती होती.

105 कुटुंबांसाठी आशेचा किरण
देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीदेखील हे गाव इतके वर्ष वीज नसल्यामुळे सूर्यास्तानंतर दुसर्‍या दिवशी सुर्योदयापर्यंत अंधारात असायचे. गावातील 105 कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री ग्राम विकास परिवर्तक आनंद जोशी. बुलूम गव्हाणमध्ये वीज आणणे व धारणीसोबत दळणवळणाची सोय करण्याकरीता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या साथीने गेल्या 10 महिन्यापासून सातत्याने प्रयत्न केल्यानंतर प्रधानमंत्री मोदींच्या सहज बिजली घर घर योजना म्हणजेच सौभाग्य योजनेच्या मदतीने आज बुलूम गव्हाणमध्ये वीज पोहोचली तर एसटी बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीची सोय करून विकासाचे पहिले पाऊल या गावी पडले.