मेळघाटातील देवदूताला भेटण्यासाठी उद्यापासून प्रेरणा दौरा

1

भुसावळ- मेळघाट जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी गेल्या 30 वर्षांपासून मोफत आरोग्य सेवा पुरविणार्‍या डॉ.रवींद्र कोल्हे व डॉ.स्मिता कोल्हे यांना भेटून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याकरीता भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे प्रेरणा दौरा 23 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. डॉ.रवींद्र कोल्हे यांनी मेळघाट जिल्ह्यातील बैरागड गावापासून वैद्यकीय सेवेस सुरूवात करून पत्नी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या साथीने आदिवासी जमातीत असलेले कुपोषण, न्यूमोनिया, सर्पदंश, मलेरिया आदींवर उपचार करून नानाविध समस्यांचे निराकरण करण्याचे काम गेल्या 30 वर्षांपासून करत आहेत. शेती व पशुपालन करून निसर्ग संवर्धनही ते करत आहेत. कोल्हे डॉक्टर दाम्पत्याच्या अगणित कष्टांचे फळ म्हणून आज मेळघाटात चांगले रस्ते, वीज, 12 प्राथमिक उपचार केंद्रे आहेत. डॉ. कोल्हे त्यांच्या रूग्णांकडून फी घेत नाहीत. उलट ते त्यांना सरकारी दवाखान्यात नेतात. जिकडे त्यांना चांगली वैद्यकीय सेवा मिळू शकेल. इतके सगळे असून सुद्धा गावात अजूनही सर्जन नाही. म्हणूनच डॉ. कोल्हे ह्यांचा लहान पुत्र राम जो अकोल्याच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस करतो आह, त्याची सर्जन होऊन वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून मेळघाटात कार्य करण्याची इच्छा आहे. अशा कोल्हे परीवाराच्या कार्याचा लेखाजोखा जाणून घेवून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी भुसावळसह परिसरातील सुमारे 30 व्यक्तींचा समूह ज्ञानासह मनोरंजन गृपच्या माध्यमातून वैरागडला 23 रोजी रवाना होत आहे. या दौर्‍यात त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे.