मेसीला रोखण्यासाठी गोलकिपरने वापरली ही ट्रिक

0

मॉस्को । फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेतील ड गटातील आईसलँड विरुद्धच्या पहिल्या लढतीत गोल न करता आल्याबद्दल अर्जेटिनाचा महान खेळाडु लिओनेल मेसीला चाहत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे मेसीला गोल न करु देणे हे स्वप्न पुर्ण झाल्यासारखे असल्याची प्रतिक्रिया आईसलँडचा गोलकिपर हँस हॅल्डॉरसन याने सांगितले. अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करत हॅल्डॉरसनने आपल्या संघाला महत्वपुणा असा एक गुण मिळवुन दिला. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार हॅल्डॉरसन म्हणाला, पेनल्टी वाचवणे हे स्वप्नवत होते. त्यामुळे मिळालेला हा एक गुण ड गटातील पुढील सामन्यांदरम्यान महत्वाचा ठरणार आहे.

हॅल्डॉरसन म्हणाला की, मेसीच्या अनेक क्लिप्स पाहिल्या होत्या. त्यामुळे माझी अपेक्शा काय असेल याची जाणिव मेसीला झाली असावी. मेसी माझ्या उजव्या बाजुला चेंडु मारेल असा अंदाज होता. आईसलँडचा पुढील सामना गुरुवारी नायजेरिया विरुद्ध होणार आहे. आईसलॅडविरुद्धच्या सामन्यातील दुसर्‍या सत्रात अर्जेटिनाचा संघ 1-1 अशा बरोबरीत होता. सामन्यातील 64 व्या मिनीटाला आईसलँडच्या खेळाडुंनी केलेल्या चुकीमुळे अर्जेटिनाला पेनल्टी किक मिळाली. ही किक मारण्यासाठी स्वत: कर्णधार मेसी पुढे आल्यामुळे गोल होणार हे निश्‍चित समजले जात होते. पण, मेसीने मारलेला शॉट आईसलॅडच्या गोलकिपरने शिताफीने अडवला. त्यानंतर उभय संघाना सामन्यात एकही गोल करता आला नाही.