मेस्सीची नकल करणाऱ्या चाहत्याने गमावला जीव

0

नवी दिल्ली-मैदानात लिओनेल मेसीची नक्कल करताना कोलकाता येथील १९ वर्षांच्या फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. सागर दास असे या तरुणाचे नाव असून तो स्थानिक क्लबमधील ज्यूनिअर संघातून खेळायचा. मैदानात मेसीचा शॉट कॉपी करताना त्याला जीव गमवावा लागला.

कोलकातामधील बेलघरिया येथील न्यू बासुदेवपूरमध्ये राहणारा सागर दास स्थानिक क्लबच्या ज्यूनिअर संघात खेळायचा. लहानपणापासूनच त्याला फुटबॉलची आवड होती. तो दररोज रात्री उशिरापर्यंत जागून फुटबॉल वर्ल्डकपमधील सामने पाहायचा. मंगळवारी संध्याकाळी फुटबॉल खेळत असताना सागरने त्याचा आवडता खेळा़डू मेसीचा एक शॉट कॉप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नादात त्याचा तोल गेला आणि तो पडला. यादरम्यान चेंडू जोरात त्याच्या छातीवर आदळला. यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सागर दासचे नातेवाईक सांगतात, त्याला लहानपणापासून फुटबॉलची आवड होती. या वर्ल्डकपमधील प्रत्येक सामना तो पाहायचा. मेसीचा तो भक्तच होता. फुटबॉलच्या वेडापायी त्याचे गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत होते, असे त्याचा चुलत भाऊ समर कोयलने सांगितले. ‘तो संघातील स्ट्रायकर होता. मेसी आणि अन्य दिग्गज खेळाडूंचे शॉट कॉपी करुन स्वतःचा खेळ सुधारण्यावर त्याचा भर होता’, असे त्याचे मित्र सांगतात. चेंडू जोरात छातीवर आदळला आणि त्याचा परिणाम ह्रदयावर झाल्याने सागरचा मृत्यू झाला, असे सूत्रांकडून समजते.