मेस्सीवरील 4 सामन्यांची बंदी झाली रद्द

0

झुरिच । जागतिक स्तरावरील अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सीवरील 4 सामन्यांची बंदी मागे घेण्यात आली आहे. बंदी मागे घेतल्यामुळे उरुग्वे, व्हेनेझुएला व पेरुविरुद्ध होणार्‍या विश्वचषक पात्रता फेरीत तो खेळू शकणार आहे. विश्वचषक पात्रता फेरीत चिलीविरुद्ध सामन्यादरम्यान सहायक रेफ्रीशी मैदानावर हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर मेस्सीवर मार्चमध्ये 4 आंतरराष्ट्रीय सामन्यातून बंदी लादली गेली होती.

लवादाकडे केले होते अपील
या बंदीनंतर त्याने लवादाकडे अपील केल्यानंतर त्याचा अर्ज मंजूर केला गेला आणि ही बंदी मागे घेतली जात असल्याची घोषणा शुक्रवारी झाली. 4 सामन्यांच्या बंदीमुळे मेस्सी यापूर्वी बोलिव्हियाविरुद्ध खेळू शकला नाही व अर्जेन्टिनाला त्या लढतीत 0-2 फरकाने पराभव स्वीकारावा लागला. पण, आता मेस्सीवरील बंदीच रद्दबातल ठरवली गेल्याने अर्जेंटिनाला मोठा दिलासा मिळाला आहे. सदर बंदीनंतर 29 वर्षीय मेस्सी व त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेन्टिनाच्या वतीने अर्जेन्टिना फुटबॉल संघटनेने त्यावर दाद मागितली होती. अर्जेंटिनाची विश्वचषक पात्रता फेरीतील पुढील लढती दि. 31 ऑगस्ट रोजी उरुग्वेविरुद्ध, दि. 5 सप्टेंबर रोजी व्हेनेझुएलाविरुद्ध तर दि. 5 ऑक्टोबर रोजी पेरुविरुद्ध होणार आहेत.