भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल ; न्यायालयाने शिक्षा सुनावताच न्यायालयात ढसाढसा रडले आरोपी
भुसावळ- ट्रॅक्टरला ओव्हरटेक केल्याचा राग आल्याने ओझरखेड्यासह साकरी व अंजनसोंडेच्या पाच संशयीतांनी मेहकरच्या बस चालकास बेदम मारहाण केल्याचा त्याचा मृत्यू झाल्याची घटना वरणगाव येथे 12 जून 2011 रोजी घडली होती. या प्रकरणी वरणगाव पोलिसात पाच संशयीतांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात चालले. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात येवून न्या.पी.आर.क्षित्रे यांनी पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच आरोपी न्यायालयात ढसा-ढसा रडले. या खटल्यात तक्रारदार वाहकाची साक्षी महत्वाची ठरली.
ट्रॅक्टरला कट ; मारहाण बेतली बस चालकाच्या जीवावर
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मेहकर आगाराची जळगाव-लोणारी बस (एम.एच.40 एन.8792) ही चालक प्रकाश नारायण म्हके व वाहक वैभव माणिकराव शिरसाठ (23, चिखली) हे भुसावळकडून मुक्ताईनगरकडे नेत असताना चालक प्रकाश म्हस्के यांनी वरणगाव गावाच्या अलिकडे भुईमुगाचा पाला नेणार्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केल्याने ट्रॅक्टर चालकाला वाहन रस्त्याच्या खाली उतरावे लागले तर बस वरणगाव शहरातील देशमुख पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर दुचाकी (एम.एच.19 बी.ए.1215) वरून आरोपींनी पाठलाग करीत बस चालकाला बसबाहेर ओढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांसह वाहक शिरसाठ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेच्या तासाभरानंतर जखमी झालेल्या चालक प्रकाश म्हस्के यांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला होता.
पाच आरोपींना अखेर जन्मठेप
बस चालकासह वाहकाला मारहाण होत असताना एस.टी. प्रवाशांनी संशयीत आरोपी समाधान भास्कर कोळी (अंजनसोंडे), प्रमोद किसन इंगळे (ओझरखेडा), सुरेश देवराम पाटील व संदीप उर्फ मनु रामा इंगळे (तीनही रा.ओझरखेडा) तसेच जयेश सारंगधर उर्फ पंडीत पाटील (साकेगाव) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा, जीवे ठार मारण्यासह विविध कलमान्वये वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात तब्बल आठ वर्ष या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर मंगळवारी न्या.पी.आर.क्षित्रे यांनी पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच आरोपी ढसाढसा न्यायालयातच रडले. आमच्या घरातील आम्हीच कमावते आहोत, आमच्याशिवाय कुटुंबाचा सांभाळ करणारे कुणीही नाही, शिक्षेत माफी द्यावी, अशी विनवणीही केली तर कारागृहात जाईपर्यंत आरोपी रडतच होते.
वाहकाची साक्ष ठरली महत्वाची
या खटल्यात एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. त्यातील महत्वाची साक्ष या घटनेतील प्रत्यक्षदर्शी तसेच तक्रारदार असलेले वाहक वैभव माणिकराव शिरसाठ यांची महत्वाची ठरली. त्यांनी तक्रार नोंदवताना दिलेली माहिती व नोंदवलेला जवाब व न्यायालयातदेखील घडल्या प्रकाराबाबत ठाम राहून आरोपींनी केलेला गुन्हा प्रत्यक्षदर्शी पाहिल्याचे सांगितल्यानंतर आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.प्रवीण भोंबे यांनी युक्तीवाद केला.