मुंबई । शालेय मुलांच्या मुंबई सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या पात्रता फेरीत घाटकोपरच्या माणिकलाल मेहता पब्लिक स्कूलने सेंट फ्रान्सिस झेव्हियर स्कूलवर 5 गुणांनी विजय मिळविताना चढाईपटू प्रतिक ढाले व मिनेश चव्हाण चमकले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेमधील दुसर्या सामन्यात आयईएस-भांडूप शाळेने वडाळ्याच्या मुंबई पब्लिक स्कूलचा 30 गुणांनी पराभव केला.
मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन, बालवीर क्रीडा मंडळ, राष्ट्रीय मिल मजदूर संघ व संधुदुर्ग बँक यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या शालेय मुंबई सुपर लीग कबड्डी पात्रता फेरीत प्रतिक ढाले व मिनेश चव्हाण यांनी दमदार चढाया करून माणिकलाल मेहता पब्लिक स्कूलला मध्यंतरास 28-17 अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्या डावात मात्र सेंट फ्रान्सिस झेव्हियर स्कूलचे आशिष यादव व राज कदम यांना चढाईत छान सूर सापडून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जादा सहा गुण आपल्या संघाला मिळवून दिले. परंत,ु सेंट फ्रान्सिस झेव्हियर स्कूलला पहिल्या डावातील 11 गुणांची पिछाडी भारी पडल्यामुळे अखेर माणिकलाल मेहता पब्लिक स्कूलने सामना 46-41 असा जिंकला. चढाईपटू तुषार कदमने दोनदा एका चढाईत 4 गुण, समीर देवलकरने एका चढाईत 4 व 3 गुण आणि बचावपटू यश मिराशीने केलेल्या सात पकडीच्या खेळामुळे आयईएस-भांडूप शाळेने मुंबई पब्लिक स्कूल संघावर पाच लोण दिले. त्यापैकी दोन लोणची परतफेड होऊनही आयईएस-भांडुप शाळेने 57-27 असा विजय नोंदवला.