मेहरुण तलाव सुशोभिकरणाचा प्रस्ताव द्या

0

जळगाव । राज्य पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांची महापौर नितीन लढ्ढा व प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी भेट घेवून शहरातील समस्यांबाबत चर्चा केली. या भेटी दरम्यान श्री. कदम यांनी शहरातील सांडपाणी नाल्याचे पाणी गिरणा नदीत सोडू नका अशा सूचना केल्या. सांडपाणी गिरणा नदीत सोडल्यास इतर ठिकाणी ज्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महापौर, आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करू असे स्पष्ट केले.

प्रस्तावानुसार तीन कोटीच्या निधीची अपेक्षा
महापौर लढ्ढा यांनी 70 ते 80 टक्के सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात येत असल्याचे मंत्री कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. शहराला भूमिगत गटारींची योजना देण्याचेही श्री. कदम यांनी सूचीत केले. परंतु, शहरात अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटारींचे काम होणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. शहराला जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी निधी मिळू शकतो याची जाणीव मंत्री कदम यांनी करून दिली. तसेच मेहरूण तलाव कारंजा, सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणासाठी 2 ते 3 कोटी रूपयांचा निधी प्रस्तावानुसार देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव तयार करतांना पुणे येथील सल्लागार निलेश यांची मदत घेवून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. कदम यांनी केल्यात.