मेहरुण मधील काही भाग विकासापासून कोसो दूर !

0

प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया : घरकुलांमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे रहिवासी त्रस्त

जळगाव – मेहरुण मधील काही परिसरांमध्ये नियमित स्वच्छता, गटारींची साफसफाई, चांगले रस्ते यामुळे विकास झालेला आहे. तर तांबापुरा,फुकटपुरा या भागांमध्ये अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, रस्त्यांची दुर्दशा, पथदिवे अशा मुलभूत सुविधाही मिळत नसल्याने विकासापासून कोसो दूर असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. उघड्या विहिरींवर जाळी बसवावी, पाण्याची एकच वेळ ठरवून द्यावी, घरकुलांमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे त्रास होत असून याठिकाणी महापालिकेने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

प्रभाग क्र. 15 मेहरुण,मेहरुण गावठाण, तांबापुरा (उत्तर पूर्व भाग), फुकटफुरा, संत गुलाबबाबा कॉलनी हा परिसर येतो. या प्रभागात गुरुवारी जनशक्तिच्या टीमचे पाहणी केली. येथील नेमक्या समस्या व महापालिका, लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या प्रभागामध्ये सर्व सामान्य नागरिक, मजूर, रोजंदारीवर काम करणार्‍या नागरिकांची संमिश्र वस्ती आहे. काही भागांमध्ये नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दहा ते 15 दिवसांपासून नियमित स्वच्छता, गटारींची साफसफाई तसेच सार्वजनिक शौचालयांची साफसफाई होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नगसेवक राहत असलेल्या भागातच स्वच्छता

महापालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन,जयश्री महाजन,प्रशांत नाईक,शबानाबी शेख यांचा हा प्रभाग आहे. चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत.नगरसेवक राहत असलेल्या भागात स्वच्छता, गटारींची साफसफाई तसेच रस्त्यांची साफसफाई होत असल्याचे दिसून आले. मात्र तांबापुरा यासह काही भागांमध्ये नाले, तसेच रस्ते व मोकळ्या जागांच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून आले. असा विरोधाभास प्रभागामध्ये दिसून आला.

परिसरात फवारणी,धुरळणी नाहीच

या प्रभागातील काही परिसरामध्ये गटारींची गेल्या काही दिवसांपासून साफसफाई होत असल्याचे चित्र आहे. तर काही प्रभागांध्ये अद्यापही गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने गटारी तुंबल्या आहेत. तर काही भागात गटारींची साफसफाई होते मात्र गटारीतील कचरा गटारीवर काढून ठेवला जातो. हा कचरा सफाई कामगार उचलत नसल्याने कचर्‍यामुळे डासांची उत्पत्ती होवून तसेच दुर्गंधी सुटून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयांची व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिक हैराण असल्याचे चित्र आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात महापालिकेकडून फवारणी,धुरळणी केली जात नसल्याचे नागरिकांनी मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का असाही प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला.

विहिरीला कठडा व जाळी नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता

मेहरुण परिसरातील जोशी पेठ परिसरात विहिर आहे. या विहिरीवर नागरिक दोराच्या सहाय्याने पाणी भरत असतात. या विहिरीला कठडे नाहीत, तसेच जाळी नाही. त्यामुळे परिसरात खेळणारे बालक, विहिरीत पडण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने या विहिरीला कठडा तयार करुन जाळी बसवावी अशी मागणी येथील महिलांनी केली. तसेच नियोजित पाणीपुरवठा असला तरी वेळ मात्र अनियमित आहे. पाण्याच्या वेळा ठरवून द्याव्यात व त्यानुसार महापालिकेने निर्धारित वेळेतच पाणी पुरवठा करावा अशीही अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.