मेहरूण तलावात बुडून सुप्रिम कॉलनीतील तरुणाचा मृत्यू !

0

जळगाव । मेहरूण तलावावर नवीन बांधकाम करण्यात आलेले गणेश घाटावर मेहूण्या व मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. संजय चंद्रदेव प्रजापती (वय 19 रा.सुप्रीम कॉलनी) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यात प्रजापती कुटूंबातील तीन सदस्यांच्या मृत्यू झाल्याने कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यातच गेल्या दिड महिन्यापूर्वी याच तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

पोहता येत नसल्याने संजय बसला होता गणेश घाटावरच…
सुप्रिम कॉलनी भागातील अमित कॉलनी येथील रहिवासी संजय प्रजापती हा औद्योगिक वसाहतीतील एका चटई कंपनीत कामाला होता. सोमवारी कामगार दिनानिमित्त कंपनीला सुटी असल्याने तो घरीच होता. सुटी असल्यामुळे संजय हा मेहुणा राजू लालबिहारी प्रजापती (वय-28, रा.अयोध्या नगर), मित्र अमृत देवंद्र प्रजापती (वय-18) व आनंद लाला गोड (वय-19) दोन्ही रा.सुप्रीम कॉलनी) असे चौघे जण सोमवारी दुपारी मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले. संजय याला पोहता येत नसल्याने तो गणेश घाटावरच बसून होता. सर्व जण पोहत असताना त्यालाही पाण्यात उतरण्याचा मोह सुटला. त्यामुळे तो घाटावरून पाण्यात उतरताच खोल खड्ड्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. पोहता येत नसल्याने पाण्यातच बुडून मृत्यू झाला.

अन् मृतदेह काढला
संजय हा तलावात उतरल्यानंतर कुठेच दिसत नाही. तसेच त्याचे कपडे घाटावरील पायर्‍याजवळ पडून होते. तो बुडाला की काय असा संशय आल्यानंतर मेहूणा राजु प्रजापती यांनी त्याचा शोध घेतला. तो बुडाल्याची खात्री झाल्यानंतर मेहुणा राजू याने रडायला सुरुवात केली. ही घटना शेजारी म्हशी चारणार्‍या तरुणाच्या लक्षात येताच त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अशरफ शेख यांना मोबाईलवरुन माहिती दिली.त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, रतिलाल पवार, अशरफ शेख यांच्यासह कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. यानंतर पट्टीच्या पोहणार्‍यांना बोलवून दीड तासानंतर दारा या तरुणाने संजयला बाहेर काढले.

प्रजापती कुटूंबियांवर काळाचा घाला
संजय याचे नुकतेच 1 डिसंबर 2016 रोजी लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या आठ दिवसांआधीच त्याची आई सुखादेवी प्रजापती यांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. हेच नव्हे तर संजय याचे लग्न होवून एक महिना उलटल्यानंतर त्याचे वडील चंद्रदेव प्रजापती यांचा देखील आजाराने मृत्यू झाल्याने प्रजापती कुटूंबियांवर दु:खाचे डोंगरच कोसळले होता. त्यातच आता काळाने झडप घातल्याने संजयचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कुटूंबियात शोककळा पसरली आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यात कुटूंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने प्रजापती कुटूंबियांना धक्काच बसला आहे. संजय याच्या पश्‍चात पत्नी अंजलीदेवी, भाऊ अनिल, वहीणी, मेहूणा राजू लालबिहारी प्रजापती असा परिवार आहे.