मेहरूण तलावात सापडला तरूणीचा मृतदेह

0

जळगाव । ऑर्डनन्स फॅक्ट्रीचा परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मयुरी सुरेशचंद्र पवार (वय 19 रा.गितावाडी, ऑटो नगर, जळगाव) या तरुणीचा सोमवारी सकाळी सहा वाजता मेहरुण तलावात पाण्यात तरंगलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, मयुरी हिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला असला तरी ही घटना नेमकी आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलीसही चक्रावले आहेत.

निकाल पाहण्यासाठी गेली अन् परतीच नाही…
बांभोरी येथील त्रिमुर्ती अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक डिप्लोमाच्या दुसर्‍या वर्षाला असणार्‍या मयुरीने ऑर्डनन्स फॅक्ट्रीत नोकरीसाठी निघालेल्या विविध पदांसाठी परीक्षा दिली होती. 4 जून रोजी या परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागणार होता. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता ती दुचाकीने (क्र.एम.एच.19 ए.एच.0485) हा निकाल पाहण्यासाठी घराबाहेर पडली. जातांना घरी निकालाचेच कारण सांगून गेली व संध्याकाळी परतच आली नाही.

तलाव काठावर मिळाली दुचाकी
मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आई शिलाबाई, वडील सुरेशचंद्र पवार व भाऊ हर्षल यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. शोध घेत असतानाच तिचा मित्र शुभम उर्फ कुणाल पवार याने मयुरीच्या वडीलांना फोन करुन तिची दुचाकी मेहरुण तलावाकाठी असल्याची माहिती दिली. त्यानुसार सर्वजण तिथे गेले असता दुचाकी व सॅँडल तलावाकाठी होते तर डिक्कीत मोबाईल व दुचाकीची चावी होती. परिसरात शोध घेतल्यानंतर रात्री 1 वाजता वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मयुरी हरविल्याची तक्रार दिली.

मृतदेह तरंगतांना दिसला
मयुरीची दुचाकी मेहरुण तलावाजवळ असल्याने तिच्या वडीलांना दु:खदायक घटनेची शंका आली होती, त्यामुळे सकाळीच ते मेहरुण तलावाजवळ पोहचले. मोठे गणपती विसर्जन करतात त्या ठिकाणी मयुरीचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाल्यानंतर त्यांना सहायक निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार निंबाळकर,भगीरथ नन्नवरे यांना घटनास्थळावर रवाना केले. यानंतर पोलिसांनी पट्टीच्या पोहणार्‍यांच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.