महिलेचा विनयभंग ; एमआयडीसी पोलीसात परस्परविरोधी गुन्हे
जळगाव: मेहरुण तलाव परिसरात सार्वजनिक ठीकाणी लघुशंका केल्यामुळे एका डॉक्टरास चार जणांनी बेदम मारहाण केली. याच घटनेत डॉक्टराने देखील समोरील व्यक्तीस मारहाण करुन महिलेचा विनयभंग केला. सोमवारी रात्री 9.30 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अशी की,
डॉ. राजेश वसंतराव पाटील (वय 54, रा. अश्विनी हॉस्पीटल, हाऊसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ते मेहरुण तलाव परिसरात लघुशंका करीत होते. याचा राग आल्यामुळे अनिल, सतीष, आनंदराव (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह 10 ते 12 जणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तसेच टोकदार शस्त्राने छातीत वार करुन जखमी केले. डॉ. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसर्या गटातील 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. राजेश पाटील त्यांच्या घरासमोर लघुशंका करीत होते. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता डॉ. पाटील, अजय सोनवणे, खुशाल जावळे (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह दोन अनोळखी तरुणांनी महिलेचा विनयभंग केला. तसेच तीच्या पतीस मारहाण केली. या प्रकरणी डॉ. पाटीलसह पाचही जणांवर विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.