मेहरूण परिसरातून धुमस्टाईलने महिलेची पोत लांबविली

0

जळगाव । लेक रेसीडेन्सी अपार्टमेंन्ट येथे मुलाला क्लासला सोडून बाहेर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील दहा ते बारा ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी धुमस्टाईलने पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून एमआयडीसी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. घटनास्थळावर चोरट्यांनी मंगळपोत हिसकावत असतांना पोत तुटल्याने काही मणी जमिनीवर पडलेले मिळून आले. यात दोन ते तीन सोन्याची मणी देखील मिळून आले आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाला क्लासला सोडण्यासाठी आली महिला
एमआयडीसी परिसरातील पोलिस कॉलनी येथील सपना मधुसुदन पवार या नेहमीप्रमाणे मंगळवारी मुलाला क्लासला सोडण्यासाठी मेहरूण तलाव भागातील लेक रेसिडेन्सी अपार्टमेंन्ट आल्या होत्या. क्लास सुटे पर्यंत त्या अपार्टंमेन्ट बाहेरच थांबतात. परंतू, आज मेहरूण तलावकडे गेल्या. तेथून परत अपार्टमेंन्टकडे येत असतांना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर लाल व पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान केलेले दोन तरूण त्यांच्याजवळ भरधाव वेगात आलेत. मोटारसायकलवर मागे बसलेल्या तरूणाने सपना पवार यांच्या गळ्यातील मंगळपात ओढली. यात मंगळपोत तुटल्याने काही मणी जमीनीवर पडले तर सात ते आठ ग्रॅम वजनाचे मणी असलेली पोत चोरटे शहराच्या दिशेने घेवून पसार झाले.