रावेर : गाते रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेनंतर मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुणच्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 26 रात्रीच्या सुमारास घडला. ओम प्रकाश ढिवर (21, मेहुणे, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव असून अपघात प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. दरम्यान, नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
गाते रेल्वे स्थानकाजवळ अपघात
मेहुण येथील ओम प्रकाश ढिवर (21) हा शनिवार, 26 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील शिरागड येथून बहिणीच्या घरून मेहुण जात असताना गाते रेल्वे स्टेशनजवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळ अपघात होवून त्यात तरुणाचा मृत्यू झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.अनिकेत चव्हाण यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावेळी रावेर पंचायत समितीचे माजी सभापती जितू पाटील, मेहुणचे माजी सरपंच विकास पाटील, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत महाजन यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात भेट देत मृतकाच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.