मेहुणबारे येथे अज्ञात वाहनाच्या धडकप्रकरणी गुन्हा

0

चाळीसगाव। तालुक्यातील मेहुणबारे गिरणा नदी पुलावर 23 मार्च रोजीजखमी अवस्थेत मिळून आलेल्या त्या इसमाचा दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला होता. त्यानंतर मेहुणबारे पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करून त्या नंतर अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र 211 वरील तालुक्यातील मेहुणबारे गिरणा नदीच्या पुलावर 23 मार्च 2017 रोजी रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान चाळीसगाव कडून मेहुणबारे कडे जाणार्‍या अंदाजे 55 वर्षीय इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या त्या इसमावर मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्या नंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णवाहिनीने धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

संपर्क करण्याचे केले आवाहन
उपचार सुरु असतांना दि 24 मार्च 2017 रोजी दुपारी 2.15 वाजता त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मेहुणबारे पोलीस स्टेशनला 21/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती. तपासा अंती मेहुणबारे पोलीस ठाण्याचे हवालदार भाऊसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशन ला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार भाऊसाहेब पाटील करीत आहेत. अपघात ग्रस्त वाहन व त्यावरील चालक आणि मयत इस्माबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशन व हवलदार भाऊसाहेब पाटील यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.