मुक्ताईनगर । तालुक्यातील तापीतीरी असलेल्या संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्री क्षेत्र मेहूण येथे जाणार्या तीनही रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. संत मुक्ताईचे गुप्तस्थान असलेल्या तापीतीरीच्या देवस्थान येथे दर्शनासाठी सदैव भाविकांची गर्दी असते. वर्षातून अनेक वेळा देवस्थानात उत्सव व सोहळे साजरे होत असतात. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून एवढेच नव्हे तर शेजारील राज्यातूनही हजारो भाविक येतात. गेल्या तीन वर्षांपासून देवस्थान येथे संत सोपानकाका समाधी सोहळा सप्ताह साजरा होत आहे. दरवर्षी हा सोहळा डिसेंबरमध्ये होत असतो. मुक्ताई देवस्थान येथे येण्यासाठी भुसावळ अथवा मुक्ताईनगर येथून तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग चिंचोल ते मेहूण देवस्थान, दुसरा मार्ग मेहूण गाव ते मेहूण देवस्थान आणि तिसरा मार्ग चांगदेव ते मेहूण देवस्थान असा आहे. परंतु या तीनही मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
प्रशासनाचा कानाडोळा
जागोजागी खड्डे पडले आहेत. आधी असलेल्या डाँबरीकरणात ठिकठिकाणी खड्डे असल्याने पायी चालणार्यांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. चांगदेव गावाहून तर रस्त्याची चाळणी झाली आहे. तसेच मेहूण गावापासून जाणारा मार्ग रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ते आहेत हे समजणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मुक्ताई देवस्थान येथे पोहोचेपर्यंत भाविक कमालीचे हैराण होत असतात. या तीनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी मुक्ताई देवस्थानासह परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. मात्र याकडे संबंधित कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी भाविकांच्या सुविधेकरिता लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी भाविकांकडून होत आहे.