मेहूणबारे येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा मुद्दा गाजला

0

अमळनेर । चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या घटनेस 50 दिवस उलटूनही तिचा शोध लागत नसल्याने विधान परिषदेच्या सदस्या आमदार स्मिता वाघ यांनी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देऊन पोलीस पथकामार्फत मूलीचा शोध सुरु असल्याचा खुलासा केला आहे.

मेहूणबारे येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणास 50 दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीस पकडण्यास यश आले नाही व मुलीलाही शोध लागत नाही म्हणून मुलीच्या आईवडिलांनी 26 मे 2017 रोजी पोलीस ठाण्यात कीटकनाशक नेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बाब आमदार वाघ यांनी तारांकित प्रश्नात उपस्थित करून हि घटना खरी आहे का? याबाबत पोलिसात गुन्हा दाखल आहे काय? यानंतर कोणती कारवाई केली? तपासास विलंबाची कारणे काय? आदी प्रश्न उपस्थित केले.

पोलीसपथकाचे शोध सुरू असल्याचा खुलासा
यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर खुलासा करताना म्हटले की, अपहृत मुलीच्या आई वडिलांनी आत्मदहनाच्या इशार्‍याबाबत निवेदन दिले होते. 26 मे रोजी दाम्पत्य पोलीस ठाण्यासमोर आले असता त्यांच्या हातात किटकनाशक औषधाच्या बाटल्या आढळून आल्या. त्यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांनी कीटकनाशक प्राशन केले नव्हते तसेच मुलीच्या बेपत्ता होण्याबाबत मेहूणबारे पोलिसात हरविल्याची नोंद झाली असून सदर मुलीस पळवून नेल्याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून याच ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे. अपहृत मुलीचा विविध पोलीस तपास पथके निर्माण करून संभाव्य ठिकाणे व भ्रमणध्वनी लोकेशन घेऊन शोध सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.