मुंबई । शिक्षक भारती या संघटनेने शिक्षकांच्या नियमित आणि मान्यता पगारासाठी चेंबूरच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर 2 मे 2012 नंतरच्या शिक्षण सेवकांना सेवा सातत्य देऊन त्वरित वेतन सुरू करण्याचे आश्वासन शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांनी दिले. त्यामुळे दीड वर्षांपासून विनावेतन काम करणार्या शिक्षकांच्या नियमित पगाराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी म्हटले आहे.
तीन महिने उलटले तरी मान्यता दिली जात नव्हती
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर शिक्षकांच्या बाजूने निर्णय देत शिक्षकांना सेवा सातत्य देण्याचा आदेश दिला होता तसेच वेतन सुरू करण्यासाठी सांगितले होते. परंतु, तीन महिने उलटून गेले तरी चेंबूर शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून मान्यता दिल्या जात नव्हत्या. मुंबईतील पश्चिम आणि दक्षिण विभागात सेवा सातत्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षक भारतीच्या आंदोलनाला यश
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन आठवड्यांत मे 2012 नंतरच्या सर्व शिक्षकांना सेवेत सामावून घेऊन पगार सुरू करण्याचे आदेश देऊनही उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयाने मान्यता रोखून धरल्या होत्या. 15 नोव्हेंबरपर्यंत मान्यता न मिळाल्यास त्यानंतर मान्यता मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष मच्छिंद्र खरात यांनी सर्व संबंधितांना दिला होता.