नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्याप्रकरणी दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मैं भी चौकीदार’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून मोदींनी देशभरातील ५०० ठिकाणच्या लोकांशी थेट संवाद साधला होता. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडियातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. दूरदर्शननेही हा कार्यक्रम दीड तास दाखवला होता. त्याविरोधात तक्रार करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस बजावली आहे. ‘नमो टीव्ही’वरून भाजपचा प्रचार करण्यात येत असल्याबाबत निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून खुलासा मागितला आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या तक्रारीनंतर हा खुलासा मागविण्यात आला आहे.