मैत्रीची बुलेट ट्रेन!

0

जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांचे धूमधडाक्यात आणि खास गुजराती पद्धतीने अहमदाबादेत स्वागत झाले. पाहुण्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता यजमानाने भासू दिली नाही. शिंजोंच्या स्वागतासाठी तर अहमदाबाद आणि गांधीनगर नव्या नवरीसारखे नटले होते. भव्य रोड-शो, स्वादिष्ट गुजराथी भोजन, अशा पाहुणचाराने शिंजोसुद्धा भारावले असतील. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा कोनशिला समारंभ तसेच भारत-जपान वार्षिक बैठकीसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन शिंजो यांच्या दौर्‍यानिमित्ताने झाले. प्रकल्पाचा शुभारंभ हा प्रमुख कार्यक्रम असला, तरी शिंजोंच्या दौर्‍यानिमित्ताने होत असलेली वार्षिक बैठक सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे.

या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण या बैठकीत मोदी-शिंजो दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या अशा विषयांवर चर्चा करतील तसेच दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे करारही होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मागील तीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरण राबवताना ज्या-ज्या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले, त्यामध्ये जपानचे नाव अग्रक्रमावर आहे. कारण या दोन देशांच्या पंतप्रधानांमध्ये जो सुसंवाद मागील तीन वर्षांपासून दिसून आला, तो सकारात्मक होता. मोदी-शिंजो यांची आतापर्यंत तब्बल दहा वेळा भेट झाली असून, प्रत्येक भेट दोन राष्ट्रांतील मैत्रीपर्व वृद्धिंगत करणारीच ठरली. पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी भारताला जपानचे मोठे सहकार्य शिंजो यांच्या आताच्या दौर्‍यात मिळू शकते, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. यापूर्वीदेखील जपानचे भारताशी चांगले संबंध होतेच. परंतु, ते आता अधिक दृढ होऊ शकतात.

मागील काही महिन्यांपासून डोकलामवरून भारत-चीनदरम्यान निर्माण झालेला वाद अगदी टोकाला पोहोचला होता. शेवटी चीन आणि भारतामध्ये समझोता झाल्याने परिस्थिती निवळली असली, तरी चीन कधीही कोणत्याही निमित्ताने पुन्हा डोके वर काढू शकतो. अशा या चीनला शांत ठेवण्यासाठीसुद्धा जपानशी वाढत असलेले संबंध अधिक प्रभावी ठरणार आहेत. दक्षिण समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत चीन आहे. भविष्यात भारताचा चीनसोबत वाद, संघर्ष झाल्यास भारताला अमेरिकेपेक्षा जपान अधिक जवळचा वाटणे स्वाभाविक आहे. काही परराष्ट्र धोरण तज्ज्ञांचेदेखील असे ठाम मत आहे आणि त्यादृष्टीने मोदी यांनी आपल्या परराष्ट्र धोरणानुसार पावले टाकण्यास सुरुवातही केली आहे. डोकलाम वादात भारताने भूतानसारख्या छोट्या देशाची बाजू घेत चीनला खडेबोल सुनावले होते.

शिवाय, शेवटपर्यंत आपली भूमिका कणखर आणि स्पष्ट ठेवली होती. जगभरातील अनेक देश चीन-भारतामध्ये सुरू असलेला वाद पाहत असताना जपानने भारताच्या भूमिकेचे जाहीर समर्थन केले होते. जपानच्या या कृतीमागे फोरमोठे धोरण आहे हे वेगळे सांगायला नको. भारत-जपान मैत्रीच्या पार्श्‍वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे दोन्ही देश चीनच्या विस्तारवादी धोरणाला लगाम लावण्यासाठी भविष्यात एकत्र येऊ शकतात. तसा संदेश यापूर्वीच डोकलाम वादानंतर जगभरात पोहोचलाच होता.

चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाला (ओबीओआर) प्रत्युत्तर देण्यासाठी भारत जपानने आशिया-आफ्रिकी बेल्टचे व्हिजन मांडले आहे. या आशिया-आफ्रिकी बेल्टसंदर्भातही मोदी-शिंजो भेटीत मोठे निर्णय, करार होऊ शकतात. संरक्षण क्षेत्रासाठीसुद्धा भारताला जपानकडून चांगले सहकार्य अपेक्षित आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे उत्तर-पूर्व आशिया आण्विक हल्ल्याच्या सावटाखाली आहे. अशी स्थिती असताना सध्या अ‍ॅबे भारत दौर्‍यावर आहेत. दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या बैठकीत उत्तर कोरियासंदर्भातसुद्धा महत्त्वाची चर्चा होऊ शकते. कारण जपानसाठी तो मुद्दा महत्त्वाचा आहे. अ‍ॅबे हे बुलेट ट्रेन तंत्रज्ञान निर्यात करण्याच्या विचारात असून, जपानसमोर भारत एक चांगला पर्याय आहे.
त्यादृष्टीने भारतात बुलेट ट्रेनसंदर्भात अ‍ॅबे यांच्या उपस्थितीत आणखी मोठ्या निणर्याची घोषणासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करू शकतात. शस्त्रनिर्मितीतसुद्धा जपानी तंत्रज्ञान जगात नावाजलेले असल्याने यासंदर्भातही मोदी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. सध्या भारत स्थानिक पातळीवर शस्त्रास्त्रे, अन्य सामग्रीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारताला जपानकडून संरक्षण तंत्रज्ञान भविष्यात उपलब्ध होऊ शकते. संरक्षणक्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये यापूर्वीसुद्धा चर्चा झालेली असल्याने त्यादृष्टीने काही करार मोदी-शिंजो भेटीत होऊ शकतात.

यामुळेच गुजरातमध्ये होणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट टे्रनचा शुभारंभ सर्वांगाने महत्त्वपूर्ण आहे. शिंजो यांच्या भारत दौर्‍याकडे शेजारी राष्ट्रांचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यापूर्वीचा अमेरिकेचा दौरा जगभरात गाजला होता. या दौर्‍यात भारताला आलेले यश विकासाच्या दृष्टीने आणि भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले होते. आता जपानशी वृद्धिंगत होत असलेले संबंधसुद्धा भारतासाठी अनेकदृष्टीने फायदेशीर ठरतील, असे वाटते. भारत-जपान मैत्रीची ही बुलेट ट्रेन मोदी-शिंजो किती वेगाने पळवतात हे भविष्यात समजेलच.