मैत्रीचे नाते दृढ करण्याचा तरुणाईचा निर्धार!

0

पिंपरी-चिंचवड : दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिवस) म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तरुणाईला या दिवसाचे प्रचंड वेड लागले आहे. मित्रांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची ही एक नामी संधी म्हणूनदेखील या दिनाकडे पाहिले जाते. दोन मित्रांमध्ये भांडण झाले असेल तर, या दिवशी झालेल्या भांडणावर पडदा टाकून नवीन मैत्रीपर्वास सुरुवात केली जाते. फ्रेंडशिप डे म्हणजे आपल्या मित्रांबद्दलची मैत्री दाखवण्याचा जणू काही एक मुहूर्तच आहे. रविवारी शहरातही फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा झाला. फे्ंरडशिप डेनिमित्त तरुणाईच्या आनंदाला एकदम उधाण आले होते.

मैत्रीचे नाते दृढ करण्याचा निर्धार
नेहमीच्या रविवारपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आजच्या ’फ्रेंडशिप डे’च्या रविवारी तरुणाईत विशेष उत्साह पाहायला मिळाला. एकमेकांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार युवक-युवतींनी केला. चिमुकल्यांमध्येही या दिवसाबाबत उत्साह पाहायला मिळाला. बाजारात उपलब्ध बहुरंगी फे्रंडशिप बॅण्ड मित्र-मैत्रिणींच्या मनगटावर बांधून अनेकांनी आपल्या मैत्रीची गाठ आणखीच घट्ट केली. रविवारी सुटी असूनही शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या आवारात ’फ्रेंडशिप डे’मुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी दिसून आली. मैत्रीदिनाचे अनोखे सेलिब्रेशन करण्यात आले.

सोशल नेटवर्किंग साईट्वर शुभेच्छांचा वर्षाव
फ्रेंडशिप डेविषयी सोशल नेटवर्किंग साईट्सवरही विशेष उत्साह पाहायला मिळाला. शनिवारी रात्री बारापासूनच फेसबुक व अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. देश-विदेशात राहणार्‍या मित्र-मैत्रिणींनी या दिवसाच्या शुभेच्छा देत मैत्रीभाव व्यक्त केला. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरवर शुभेच्छा दिल्या जात होत्या.

कविता, शुभेच्छापर संदेशांची चलती
मैत्री व्यक्त करण्याच्या दिवशी आपला जवळचा मित्र-मैत्रिण भेटू शकत नसल्याने मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ’एसएमएस‘चा आधार अनेकांनी घेतला. अनेकांनी फेसबुकवरून मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देणे पसंत केले. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरवर तर मैत्रीच्या शुभेच्छांचा वर्षाव ओसंडून वाहत होता. कविता, शेर, शुभेच्छापत्रे याद्वारे अनेक जण मैत्रीविषयी भावना व्यक्त करीत होते. फे्ंरडशिप डेनिमित्त सोशल मीडियावर कविता, शेर व शुभेच्छापर संदेशांची चलती होती.