धुळे । मैत्रेयचे गुंतवणुकदार ग्राहक आणि शेकडो प्रतिनिधींनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत आपल्या गुंतवणुकीचा पैसा परत मिळावा म्हणून आवाज उठवला. गेल्या 18 महिन्यांपासून मैत्रेयच्या ग्राहकांना एक रुपयांचाही परतावा मिळाला नसून हलावदिल झालेले गुंतवणूकदार आणि प्रतिनिधींनी मैत्रेयच्या नामे आणि बेनामी संपत्तींचा लिलाव करुन त्यातून गुंतवणूकदारांची रक्कम परत केली जावी अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शेने केली.
पांझरा नदी किनारच्या चौपाटीवरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मैत्रेय उद्योग परिवारातील विविध कंपन्यांमध्ये हजारो लाखो रुपयांची गुंतवणूक करुन अडकलेल्या ग्राहकांनी प्रतिनिधींनी मैत्रेय उपभोक्ता एवम् अभिकर्ता असोसिएशन या संघटनेच्या बॅनरखाली धुळ्यातील पांझरा नदी किनारच्या चौपाटीवरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो महिला पुरुष सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगवान पाटील, उपाध्यक्ष प्रदिप विश्वासराव शिसोदे, सचिव निलेश शिवाजी वाणी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवदेनातून मैत्रेयच्या ग्राहकांचे हाल मांडले.
कंपनी किंवा प्रशासनाकडून कोणतेही आश्वासन नाही
गेल्या 18 महिन्यांपासून मैत्रेय कंपनीकडून कुठलाही परतावा मिळत नाही. कंपनी किंवा प्रशासनाकडून कोणतेही आश्वासन दिले जात नाही. नाशिक कोर्टाचा निकाल लागला असून तो ग्राहक प्रतिनिधींना काही अंशीच मान्य आहे. कारण कोर्टाने निकाल देतांना फक्त नाशिकस्थित ग्राहकांची रक्कम दिल्यानंतर इतर जिल्ह्यांचा प्रश्न निकाली काढण्यात येईल असा स्पष्ट आदेश दिला आहे. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील लाखो ग्राहक मैत्रेयकउून त्यांचा हक्काचा पैसा परत मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. 5 फेब्रुवारी 2015 पासून कंपनी बंद असून कंपनीचा सर्व डाटा माहिती सरकारवाडा पोलिस स्टेशन नाशिक यांचेकडे जमा असून त्यातील माहितीनुसार ग्राहकांना परतावा दिला जावा.
कंपनीच्या अघोषीत मालमत्तेचा शोध घ्यावा
मैत्रेय सर्व्हिसेस प्रा.लि., मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड कंस्ट्रक्शन प्रा.लि., मैत्री रिअलटर अॅण्ड कंट्रक्शन प्रा.लि. आणि मैत्री सुवर्णसिध्दी प्रा.लि. या चारही कंपन्यांची मालमत्ता प्रशासनाने घोषित करावी. प्रशासनाने कंपनीच्या अघोषीत मालमत्तेचा शोध घ्यावा. कंपनीच्या संचालकांना समोर येण्यास भाग पाडावे आणि प्रशासन व कंपनी यांनी मालमत्ता जाहिररित्या विक्री करुन ग्राहकांचा परतावा त्वरीत द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आल्या. मोर्चात मैत्रेय उपभोक्ता एवम् अभिकर्ता असोसिएशनचे खजिनदार मंगल गणेश परदेशी, सहसचिव गौतम महाजन, सदस्य अशोक वामन चौधरी, पांडूरंग श्रावण बंडगर, बाबुराव नथ्थु घुले, सुभाष आनंदा पाटील, ज्ञानेश्वर उत्तम पाटील, सतिष पाटील आदींसह शेकडो जण सहभागी झाले.